Breaking News

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण होणार

अलिबाग : प्रतिनिधी
कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 5) मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते पनवेलपर्यंत रस्त्याची अधिकार्‍यांसह पाहणी करून आढावा घेतला. या वेळी मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होऊन सुरू होईल, तर डिसेंबर 2023अखेरपर्यंत पूर्ण महामार्ग सुरळीतपणे सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या पाहणी वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे आरो अंशुमन श्रीवास्तव, मुख्य अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग जगदीश सुखदेवे तसेच इतर शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाची भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. पाऊस खूप पडत असल्याने पावसामध्ये रस्त्याचे काम करता येत नाही. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून सिमेंट ट्रीटेड बेस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिकाचे काम पूर्ण होऊन ती सुरू होईल. हे झाल्यावर कोकणात गणेशोत्सवासाठी येणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होईल.
मंत्री चव्हाण यांनी नागोठणे येथील वाकण फाटा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून हे काम कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. सध्या पावसाळ्यात महामार्गाचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरू आहे. यामध्ये हलगर्जीपणा नको तसेच रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
विविध परवानग्यांची कार्यवाही पूर्ण
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी असलेल्या वनविभाग, भूसंपादन, न्यायलयीन प्रक्रिया व अन्य बाबींच्या परवानग्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून येत्या डिसेंबर 2023 अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वेळी सांगितले. मंत्री चव्हाण यांनी पेण तालुक्यातील जिते गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

Check Also

पनवेलमधील विजेचा प्रश्न निकाली

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दोन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील छत्रपती …

Leave a Reply