Breaking News

मुंबई ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत

अलिबाग : प्रतिनिधी
येत्या 1 नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यानंतर मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. सध्या बेलापूर ते जेएनपीटी, एलिफंटादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू आहे. मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवादरम्यान वॉटर टॅक्सीसेवेची घोषणा केली आहे.
मुंबई ते मांडवा दरम्यान जलमार्गाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 400 रुपये मोजावे लागणार आहेत. नयनतारा शिपिंग कंपनीचे संचालक रोहित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉटर टॅक्सीमधील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हे जहाज तयार करण्यात आले आहे. या जहाजातून जवळपास 200 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. जलवाहतुकीदरम्यान प्रवाशांना जहाजात एसीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच गेटवे ऑफ इंडिया येथूनदेखील वॉटर टॅक्सीसेवा उपलब्ध होणार आहे. सध्या त्याला मांडवादरम्यानच्या क्रुझ टर्मिनलवरून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. येत्या 10 ते 15 दिवसांत गेट वे ऑफ इंडिया येथून वॉटर टॅक्सीसेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळणार आहे. त्यानंतर बेलापूर ते एलिफंटादरम्यान गेटवे ऑफ इंडिया येथूनसुद्धा ही सेवा सुरू करण्यात येईल.
1 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या या वॉटर टॅक्सीचे बुकिंग 29 ऑक्टोबरपासून सुरू होईल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवासी 29 ऑक्टोबरपासून ऑनलाइन तिकीट काढू शकतात. सुरुवातीच्या दिवसांत मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सकाळी 10.30 वाजल्यापासून वॉटर टॅक्सीसेवा उपलब्ध असेल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार वेळेत बदल करण्यात येणार आहे, तर गेटवे ऑफ इंडियाया ठिकाणाहून सेवा सुरु झाल्यावर सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत टॅक्सी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेदेखील सांगण्यात आले आहे.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply