खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील ढेकू गावच्या हद्दीत फुडमॉलजवळ भरधाव वेगात असलेली कार समोरून जाणार्या ट्रकच्या मागे घुसल्याने कारमधील चार जण ठार झाले असून, दोघे गंभीर आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 9) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला.
पुण्याकडून इर्टिका कार (एमएच 14-एफजी 205)ने सहा प्रवासी मुंबईकडे जाण्यास निघाले होते. खालापूर हद्दीतील फुडमॉल येथे चालकाचे नियंत्रण सुटून ही कार समोरून जाणार्या ट्रक (एमएच 48-टी 9809)च्या मागच्या बाजूला घुसली. या अपघातात कारमधील तिघे जागीच; तर एक गंभीर जखमी महिला एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावली. अपघातामध्ये सुष्मीत अभिजीत मुथा (वय 22, रा. नगर) प्रिया राणी गौर (वय 35, रा. मध्य प्रदेश), जानकी नंदकुमार नाणेकर (वय 27, रा. वडवली, अंबरनाथ) यांचा समावेश असून, एका मयताची ओळख उशिरापर्यंत पटली नाही; तर प्रीती रामी (37), तसेच कारचालक प्रतीक जाधव (वय 26) हाही जखमी झाला आहे.