संचालक मंडळाच्या हालाचाली सुरू; सल्लागारांची नियुक्ती
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई शहरात सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून वाशीतील इमारतींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता 2005पासून धोकादायक यादीत समाविष्ट होत असलेल्या कांदा-बटाटा बाजाराच्या विकासाबरोबरच इतर चारही बाजाराचा पुनर्विकास एकत्रितपणे करण्याच्या निर्णय एपीएमसी संचालक मंडळाने घेतला घेतला आहे. याकरिता सल्लागार यांची नेमणूक करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून इमारत संरचना योजना आखण्यात येणार आहे. बाजार समितीच्या घटकांसमोर पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण मांडण्यात येणार असून मंजुरीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. सन 1982मध्ये कांदा-बटाटा मार्केटच्या इमारतीची उभारणी करण्यात आली होती. या बाजार आवारातील इमारतीची बांधणी ही सिडकोनिर्मित असून 2005पासून वर्षानुवर्षे धोकादायक यादीत समाविष्ट होत आहे. पुनर्बांधणीमध्ये व्यापार्यांनी वाढीव एफएसआय मागणी केली आहे. विविध कारणांनी कांदा-बटाटा पुनर्विकास रखडला आहे. गेल्या वर्षभरापासून कांदा-बटाटा बाजाराचा पुनर्विकास मार्गी लागेल, अशा चर्चांना उधाण आले होते. नुकतेच एपीएमसी संचालक मंडळाने बैठक घेऊन कांदा बटाटा व भाजीपाला, अन्नधान्य आणि मसाला या पाचही बाजार समितीचा पुनर्विकास एकत्रितपणे करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीकडे निधी उपलब्ध नसल्याने बांधा आणि वापरा तत्वावर हा पुनर्विकास होणार असून त्याकरिता एपीएमसी संचालक मंडळाने सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.