पनवेल : प्रतिनिधी
पनवेल एसटी आगारात जुन्या गाड्या आणि चालक-वाहकांची कमतरता असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यास अडचण येत आहे. आगाराच्या कामाला मुहूर्त सापडत नाही. त्यामुळे पनवेलच्या प्रवाशांचे हाल होत असल्याने एसटीने नवीन गाड्या आणि कर्मचारी तरी द्यावेत, अशी मागणी पनवेल प्रवासी संघटनेचे सचिव श्रीकांत बापट यांनी केली आहे. पनवेल एसटी आगाराचे घोंगडे अनेक वर्षे भिजत पडले आहे. त्यामुळे पनवेल आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात येत नाहीत. पनवेलहून नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरकडे जाणारे अनेक प्रवासी असतात, पण त्या ठिकाणी जाण्यासाठी पनवेल आगारातून गाडी नसल्याने बाहेरून येणार्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. पनवेल आगार हे मुंबई विभागाच्या अंतर्गत येते. मुंबईमध्ये न्यायालयाच्या आदेशामुळे आठ वर्षापेक्षा जुनी गाडी नेता येत नसल्याने या विभागातील आठ वर्षापेक्षा जुन्या गाड्या पनवेल आगाराला दिल्या जातात. या गाड्या लांब पल्ल्यासाठी वापरणे धोकादायक असते. त्यामुळे या गाड्या गाव खात्यात वापरल्या जातात. पनवेलहून नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरकडे जाणारे अनेक प्रवासी असल्याने प्रवासी संघटनेने अनेक वर्षे या ठिकाणी जाणार्या गाड्या पनवेलहून सोडण्याची मागणी केली आहे, पण पनवेल आगारात चालक-वाहक पुरेसे नाहीत आणि जुन्या गाड्या असल्याने या मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत असल्याने पनवेल आगाराला नवीन गाड्या आणि चालक-वाहक देण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी संघटनेचे सचिव श्रीकांत बापट यांनी केली आहे.