मखरात थर्माकोलचा सर्रास होतोय वापर

महाड : प्रतिनिधी
प्लास्टिक आणि थर्माकोल वापरावर बंदी असली तरी बाजारात प्लास्टिकच्या माळा सजावटीसाठी दाखल झाल्या आहेत, तर मखरांमध्येदेखील थर्माकोलचा वापर होत आहे. याबाबत नगर परिषद प्रशासन आणि प्रदूषण मंडळ भावनिक मुद्दा पुढे आणून दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संतुलन आणि स्वच्छतेची ऐसीतैसी सुरूच आहे.
एकीकडे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या प्लास्टिकवर आता निर्बंध आले असले तरी या ना त्यातून प्लास्टिक बाजारात येतच आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आणि शहरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. ज्या ठिकाणी श्रीगणेशाची मूर्ती बसवली जाते तेथे आकर्षक सजावट केली जाते. याकरिता बाजारात आता तयार वस्तू मिळू लागल्या आहेत. यामध्ये चिनी बनावटीचे सामान अधिक दिसून येते. हे सामान आकर्षक आणि कमी किमतीला असले तरी तकलादू असते. गंभीर बाब म्हणजे यामुळे कचर्याच्या समस्येत अधिकच भर पडते. शासनाने प्लास्टिक बंदी घातली असली तरी विविध मार्गांनी प्लास्टिक बाजारात येतच आहे. आरास करण्यासाठी बाजारात प्लास्टिकच्या विविध माळा, प्लास्टिकचे आकर्षक कापड, फुले, मणी दाखल झाले आहेत. या माळा, फुलेदेखील पातळ प्लास्टिकपासूनच बनवल्या आहेत. यामुळे प्लास्टिक आपली पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने कडक पावले उचलत प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली. त्याचप्रमाणे थर्माकोल वापरावरदेखील निर्बंध आणले. हे थर्माकोल पालिका स्वच्छता कर्मचारी कचर्यातदेखील स्वीकारत नाहीत. असे असले तरी सध्या बाजारात मखरांसाठी खुलेआम थर्माकोलचा वापर केला जात आहे. याकडे पालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ दुर्लक्ष करीत आहे. गणेशोत्सव हा भावनिक मुद्दा असल्याचे सांगून कारवाई टाळली जात आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण, प्लास्टिक बंदी, स्वच्छतेचे तीन तेरा वाजत आहेत.
गणेशोत्सव काळात प्लास्टिक व थर्माकोलच्या होणार्या वापरावर कारवाईसाठी महाड नगर परिषदेलादेखील अधिकार आहेत. यासंदर्भात प्रशासनाला पत्र दिले आहे.
-जयदीप कुंभार,क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महाड