Breaking News

तटकरेंचा सत्तेचा माज जनता उतरवेल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात; पेणमधील निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण ः अनिस मनियार

एखाद्या घटनेचे राजकीय स्वार्थासाठी भांडवल करून घेणे ही खासदार सुनील तटकरे यांची वृत्ती असून गेली 20-25 वर्षांत विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम ते करीत आहेत. त्यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल हे निर्विवाद सत्य आहे. प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर सत्तेचा गैरवापर करीत पोलीस यंत्रणेला चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यास भाग पाडण्याच्या वृत्तीविरोधात भाजप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (दि. 29) पेणमध्ये आयोजित निषेध मोर्चाप्रसंगी दिला. या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता, तसेच पेणमधील व्यापारी, फळविक्रेते, दुकानदार, भजीवाले दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले होते.16 ऑक्टोबर रोजी पेण न. प.च्या स्थायी समितीच्या सभेत नरदास चाळ येथील सांडपाण्याचा निचरा समस्या निवारणप्रश्नी गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी मुख्याधिकार्‍यांना जाब विचारला होता. यावरून मुख्याधिकार्‍यांनी गटनेत्यांविरोधात पेण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला, परंतु पोलीस यंत्रणेनेही कोणतीही शहानिशा न करता 353 कलमान्वये गुन्हा दाखल केल्याने जनतेच्या प्रश्नासंबंधी जाब विचारणार्‍या लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करणे निषेधार्ह असून, त्याविरोधात गुरुवारी वैकुंठ निवास येथून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रचंड रॅली काढण्यात आली. या रॅलीचे न. प. कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. या वेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, पनवेलचे उपमहापौर जगदिश गायकवाड, पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, पनवेल मनपा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, सभापती मोनिका महानवर, सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, चिटणीस बंडू खंडागळे, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, उपमहापौर जगदिश गायकवाड, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनीही तटकरेंच्या मनमानी कारभाराविरोधात जहरी टीका केली. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, सूडाचे राजकारण करताना तटकरे यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकल्याने पोलिसांनी सारासार विचार न करता रात्री 12 वाजता माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती घेतली. आमदार रविशेठ पाटील यांना बदनाम करण्यासाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो हे यावरून तटकरेंनी सिद्ध केले असून या प्रकरणाचा जाब येत्या विधानसभा अधिवेशनात सरकारला विचारणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तटकरेंशी राजकीय मैत्री करणारे इतर पक्षाचेही अस्तित्व संपविण्याचे काम ते करीत असून शिवसेनेचे जिल्ह्यात तीन आमदार असूनही पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला गेले, तसेच शासकीय कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून शिवसेनेच्या आमदारांनी तक्रार दिली असून ही शिवसेनेसाठी शोकांतिका आहे. आगामी काळात तटकरे भाजपला नंबर एकचा राजकीय शत्रू मानतात. आम्हीही तटकरेंना जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही या वेळी दरेकर यांनी दिला. प्रास्ताविकपर भाषणात नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सांगितले की, 16 ऑक्टोबरला जी घटना घडली ती एकप्रकारे लोकशाहीची हत्याच असून जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करीत असताना 353 सारखे गुन्हे दाखल होतात. जनतेच्या प्रश्नांकडे जर अधिकारी दुर्लक्ष करीत असतील तर लोकप्रतिनिधींनी जाब विचारणे म्हणजे गुन्हा आहे का, असा सवालही त्यांनी केला. गटनेत्यांनी सर्वसामान्यांची भावना पोहचविण्याचे काम केले. तटकरेंनी या घटनेचे राजकरण केले, परंतु जनतेचे काम करताना असे अनेक गुन्हे अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत. 10 वर्षे पेण अर्बन बँकेचा प्रश्न प्रलंबित असून तटकरे जेव्हा अर्बन बँकेचा प्रश्न मांडण्याची भूमिका घेतात तेव्हा समजायचे की निवडणुका आल्या आहेत. निवडणुका झाल्या की सगळे विसरायचे हीच त्यांची भूमिका असून पेणकर त्यांच्या आश्वासनांना भुलणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आघाडीतील नेत्यांकडून राजकारण करण्याचे काम -आ. प्रशांत ठाकूर

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात विकासकामांचा झंझावात पसरविला. भाजपच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. याउलट ज्यांनी 15-20 वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले त्यांनी जिल्ह्याचा काय विकास केला, असा सवाल करीत अंतुलेसाहेब सांगायचे हे पालकमंत्री म्हणून नाही तर मालकमंत्री म्हणून वावरत आहेत. अशा मालकांचे दात जनता घशात घातल्याशिवाय राहणार नाहीत. कोरोना तसेच अतिवृष्टीच्या काळात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करून लोकांचे अश्रू पुसण्याचे काम केले, परंतु आघाडीतील प्रमुख नेत्यांनी फक्त राजकारण करून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम ते करीत आहेत. आघाडीत बिघाडी होत असून शिवसेनेचे लोक यांच्यासोबत बैठक घेण्यास तयार नाहीत. मागील काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विरोधक हे आपले शत्रू नाहीत या भूमिकेतून काम केले, परंतु आघाडी सरकारमधील सुनील तटकरे हे भाजपला शत्रू मानत असून त्या भूमिकेतून जिल्ह्यात राजकारण करीत आहेत, मात्र या कट कारस्थानाला भाजप कार्यकर्ता जशास तसे उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिला.

भाजपने रायगडात विकासाचे राजकारण केले असून मी पालकमंत्री असताना कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय केला नाही. त्यामुळे रायगडात भाजपची ताकद वाढली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोकणात विविध विकासकामांना चालना देण्याचे काम केले. शेतकर्‍यांसाठी हमीभाव केंद्राची व्यवस्था केली. कोरोना, निसर्ग चक्रीवादळात लोकांना मदत केली. ही भाजपची काम करण्याची पद्धत असून महाविकास आघाडी सरकारला मात्र जनतेच्या प्रश्नांबद्दल अनास्था असून रायगडात सुनील तटकरे फक्त राजकारण करण्याचे काम करीत आहेत. आजच्या बंदमधून पेणकरांचे आमदार रविशेठ पाटील यांच्याबद्दलचे प्रेम दिसून आले. पेण न. प.तील या प्रकरणावर सभागृहात जाब विचारणार आहे.

– रवींद्र चव्हाण, माजी पालकमंत्री

पेणमधील प्रकरणामागचा बोलविता धनी कोण आहे हे जनतेला ठाऊक आहे. महाविकास आघाडीमधील एकेक पक्षाला संपविण्याचे काम खासदार सुनील तटकरे हे करणार असून आता शेकापची अवस्था काय आहे हे दिसत आहे. शिवसेना नेत्यांची अवस्थाही अशीच असून यामुळे शिवसेनेने सतर्क होणे गरजेचे आहे. पेणमधील घटनेचा विषय येत्या अधिवेशनात घेणार असून असा कोणता गुन्हा होता की माझ्या घरी रातोरात पोलिसांनी झडती घेतली. यामागचे खरे सूत्रधार तटकरे असून असे गलिच्छ राजकारण करणार्‍या नेत्याला पेणमधील जनता पाय रोवू देणार नाही. पेणसारख्या सुसंस्कृत शहरात घाणेरड्या राजकारणाचा पायंडा पाडण्याचे काम करण्याचा प्रयत्न होत आहे. भ्रष्टाचारी असलेल्या या नेत्याला येत्या काळात पेणची जनता माफ करणार नाही.                      -रविशेठ पाटील, आमदार

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply