Breaking News

नागोठण्यात घरफोडी : प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे कार्यालय फोडून 38 हजार चोरले

नागोठणे : प्रतिनिधी

येथील प्रियदर्शनी चालक मालक वाहक सहकारी वाहतूक संस्थेच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली. डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

मुंबई – गोवा महामार्गाच्या फाट्यावरून रिलायन्स कंपनी आणि पोयनाडकडे जाणार्‍या रस्त्याच्या उजव्या बाजूला प्रियदर्शनी वाहतूक संस्थेची इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर संस्थेचे कार्यालय असून कार्यालयाची नियमित साफसफाई करण्यासाठी गुरुवारी सकाळी सात वाजता कमला राजेंद्र मढवी ही महिला तेथे आली. इमारतीच्या तळमजल्यावर असणारे शटर उघडे असल्याने ही महिला पहिल्या मजल्यावर गेली असता, कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तसेच कुलूप तोडले असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तशी माहिती तिने संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिली. संस्थेचे अध्यक्ष बाळा टके, संचालक सिराज पानसरे, विठोबा दंत, सचिव प्रदीप दुर्वे, मारुती भोसले, शकील शेख यांनी तेथे धाव घेऊन व परिस्थिती जाणून घेतली व तातडीने पोलीस ठाण्यात खबर दिली.

अज्ञात चोरट्यांनी कार्यालयात असणारे लोखंडी कपाट फोडून आतील लॉकरमध्ये असणारी 38 हजाराची रोकड लंपास केली. तसेच तळमजल्यावर असणार्‍या एका कार्यालयाचा मुख्य दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला होता, मात्र कार्यालयात कागदपत्रांव्यतिरिक्त दुसरे काहीच आढळून न आल्याने त्यांना तेथू रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले असल्याचे आढळून आले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात भादंवि कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार राजेंद्र घाटगे पुढील तपास करीत आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply