माथेरान ़: प्रतिनिधी
प्रवासी कराची वसुली कर्मचार्यांमार्फत सुरू केल्यामुळे माथेरान नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडली आहे. दिवाळीच्या हंगामात 24 ते 30 ऑक्टोबर या केवळ सात दिवसात एकूण 40 हजार 350 पर्यटकांकडून नगर परिषदेला 20 लाख 53 हजार इतकी विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. माथेरान नगर परिषदेतर्फे दरवेळी प्रवासी कर वसुलीचा ठेका जात होता. आजवर अनेक ठेकेदारांनी या ठेक्याची पूर्ण रक्कम अदा केली नसल्यामुळे नगर परिषदेला लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते. मात्र सुरेखा भणगे यांनी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी नगर परिषदेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या प्रवासी कर संकलनावर लक्ष केंद्रित केले. ठेका न देता नगर परिषद कर्मचार्यांकडून प्रवासी कर वसुली सुरू केल्यामुळे उत्पन्नात भर पडली आहे. प्रवासी कराच्या उत्पन्न वाढ व्हावी व आर्थिक व्यवहार पारदर्शक रहावा, यासाठी नगर परिषदेने सप्टेंबर 2022 पासून डिजिटल तिकीट प्रणाली सुरू केली आहे. तिकिटावर पावती क्रमांक, दिनांक, वेळ आणि नगर परिषदेची सर्व माहिती बारकोडद्वारे देण्यात आली असून, एका क्लिकवर कार्यप्रणालीची माहिती मिळत असल्यामुळे पर्यटक व नागरिक समाधानी आहेत.