अलिबाग : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 500 आदिवासी मजूर कर्नाटकात अडकून पडले आहेत.
हे सर्वजण कोळसा भट्ट्यांवर काम करण्यासाठी कर्नाटकातील चार जिल्ह्यात स्थलांतरीत झाले होते, मात्र मजुरांचे ठेकेदार पळून गेल्याने सारे अडचणीत सापडले आहेत.आता स्थानिक प्रशासनाकडून त्यांची व्यवस्था केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील आदिवासी कुटूंब दरवर्षी कोळसा भट्ट्यांवर काम करण्यासाठी कर्नाटकमध्ये स्थलांतरीत होत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील ठेकेदार त्यांना तिकडे घेऊन जातात. काम संपले की सर्व जण आपापल्या घरी परतत असतात, मात्र देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्याने हे सर्व जण कर्नाटकात अडकून पडले आहेत. गंभीर म्हणजे या सर्वांना मजुरीसाठी नेणारे ठेकेदार पळून गेल्याने मजुरांची आर्थिक कोंडी झाली. हे सर्व जण कर्नाटकातील चिकबेलापूरमधील अनंतपूर, म्हैसूर जिल्ह्यातील नंदनगुड येथे शिवकाहल्ली आणि बंगळुरूजवळील सिरा येथे अडकून पडले असल्याची माहिती सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी दिली.
स्थलांतरीत आदिवासी मजुरांचा प्रश्न हा प्रश्न सामाजिक संघटनांनी स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर तेथील तहसीलदारांनी या सर्वांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था केली आहे, मात्र लॉकडाऊन संपणार नाही तोवर या सर्वांना तिथेच राहावे लागणार आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाने सर्व कामगारांच्या राहण्या-खाण्याची सोय केली असून सध्या सर्वजण सुखरुप असल्याचे दिनेश पवार या मजुराने साांगितले.
रायगडातील अडकून पडलेल्या मजुरांची व्यवस्था कर्नाटकमधील स्थानिक प्रशासनाने केली आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत सर्व मजुरांना तिथेच रहावे लागेल.
-डॉ. पद्मश्री बैनाडे, निवासी जिल्हाधिकारी, रायगड