Breaking News

पेण अर्बन बँक ठेवीदारांबाबत सहकारमंत्र्यांसोबत बैठक घेणार -भाजप नेते किरीट सोमय्या

पेण : प्रतिनिधी
पेण अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 13) भेट देऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी लवकरच सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे ठेवीदारांना आशेचा किरण दिसू लागला आहे.
पेण अर्बन ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या बँकेच्या मुख्य शाखेत आले होते. त्यांच्यासमवेत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री व स्थानिक आमदार रविशेठ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रितम पाटील, माजी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, सुनील गोगटे, युवा नेते ललित पाटील, शांता भावे यांच्यासह खातेदार, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेण अर्बन बँक सन 2010मध्ये बुडीत निघाली आणि पेणसह रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला. यामुळे सहकार क्षेत्राला मोठा हादरा बसला होता. 75 वर्षांची परंपरा असलेल्या या बँक घोटाळ्याला एक तप होऊन गेले असून ठेवीदार व खातेदार आपले पैसे कधी मिळतील या आशेवर आहेत. यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले की, सहकारमंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच पेण अर्बन बँक ठेवीदारांबाबत संबंधितांची बैठक होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. संचालकांनी बँकेची जी लूट केली आहे त्याबाबत कोर्टात खटला सुरू होण्याची मागणीही करणार आहोत. एक लाख 65 हजार ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी महिन्यापूर्वीदेखील सहकारमंत्री यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली होती.
आनंदाची बाब म्हणजे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या प्रॉपर्टीची विक्री करण्यासाठी तयारी दाखविली आहे. बँक आणि ईडीमध्ये जे वाद चालू होते ते मिटले आहेत. ठेवीदारांना पैसे परत मिळावे म्हणून ते प्रॉपर्टीवरील आपला हक्क कोर्टात मागे घ्यायला तयार आहेत. बँकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, बँकेने कोर्टात केलेला अर्ज मागे घेण्यात येईल. पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाऊन ईडीच्या अधिकार्‍यांशी बोलून कोर्टात जाऊन ईडी आपला हक्क मागे घेईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे काही प्रॉपर्टी विकण्यासाठी काढाव्या लागणार आहेत. या बँकेने रिझर्व्ह बँकेला पत्र देऊन पाच लाख व एक लाख देण्याची मागणी केली आहे, परंतु पाच लाख देता येणार नाही, असे इन्शुरन्स कंपनीने कळविले आहे. त्यामुळे एक लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले. या वेळी यांनी बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेन जाधव यांच्या निवासस्थानीही सदिच्छा भेट दिली.
पेण अर्बन बँकेच्या सर्वच्या सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत आजपर्यंत पहिल्या टप्प्यात 10 हजार आणि दुसर्‍या टप्प्यात 25 हजार रुपये असतील अशा 20 हजारांहून अधिक ठेवीदारांना त्याची रक्कम परत मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आता जे उर्वरित ठेवीदार आहेत त्यांना रक्कम मिळवून देण्यासाठी जप्त प्रॉपर्टींची लवकरात लवकर विक्री व्हावी, अशी आमची मागणी असून आलेल्या रकमेतून उर्वरित सर्व ठेवीदारांना त्याच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असे बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेन जाधव यांनी सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply