प्रवाशाची वाट पाहताना विरंगुळा म्हणून सोबतच्या अन्य एखाद्या रिक्षाचालकाने सहज देऊ केलेल्या तंबाखू वा गुटख्यातून जडणारी ही सवय व्यसनात कधी परिवर्तित होते ते बहुदा कुणाच्याच ध्यानात येत नाही. वेळेवर जेवण मिळत नसल्याने भूक मारण्यासाठी, प्रदूषणाचा त्रास टाळण्यासाठी, कुटुंबापासून दूर राहताना जाणवणार्या एकाकीपणापासून स्वत:ला सावरताना किंवा जगण्याच्या सगळ्याच विवंचना घडीभर विसरण्यासाठी रिक्षाचालक तंबाखूचा आधार घेतात असे सर्वेक्षणात आढळून आले आहे.
रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालकाला तंबाखूचा बार लावताना किंवा तोंडातल्या गुटख्यामुळे ओठांचा चंबू करून हाताने थुंकी पुसत कसाबसा संवाद साधताना आपण सारेच नेहमीच पाहतो. पण रिक्षाचालकांमध्ये सर्रास आढळणार्या या सवयीचे परिणाम किती घातक आहेत हे अलीकडेच मुंबईतील ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणातील 45 टक्के रिक्षाचालकांमध्ये, अर्थात प्रत्येक 10 रिक्षाचालकांपैकी किमान चार जणांमध्ये कॅन्सरची प्राथमिक लक्षणे आढळून आली आहेत. शहराभरात पाच-सहा वेगवेगळ्या भागांत व विशेषत: पश्चिम उपनगरांत तीन हजार रिक्षाचालकांमध्ये केलेल्या या पाहणीत 85 टक्के रिक्षाचालक तंबाखूचे सेवन करताना आढळले. हे सर्वेक्षण मुंबई शहरापुरते मर्यादित असले तरी तंबाखूसेवनाची ही सवय सर्व ठिकाणच्या रिक्षाचालकांमध्ये दिसून येते. हे घटक सर्वच ठिकाणच्या रिक्षाचालकांमध्ये तसेच अन्य श्रमजीवींमध्येही दिसून येतील. शारीरिक कष्टाची कामे करणार्या वर्गात यातूनच तंबाखू-गुटख्याचे व्यसन लागलेले आढळून येते. तंबाखूची ही सवय घातक आहे इतपत माहिती बहुतेकांना असतेच, परंतु तरीही एकदा का हे व्यसन जडले की त्यापासून सुटका मिळवणे कठीणच जाते. मुंबईतील रिक्षाचालकांची ही सवय सुटावी याकरिता उपरोक्त स्वयंसेवी संस्था तंबाखुमुक्ती कार्यक्रम राबवणार आहे. रिक्षाचालकांच्या समुदायातूनच काही रिक्षाचालक या कामी स्वयंसेवक म्हणून पुढे सरसावले आहेत ही यातली सर्वात जमेची बाजू. सहकार्यांची साथ मिळाली तरच अनेकांना या व्यसनातून मुक्ती मिळू शकेल. काही जणांनी तर एक पाऊल पुढे जाऊन आपण प्रवाशांनाही तंबाखूसेवनापासून रोखणार असल्याचे म्हटले आहे. असा पुढाकार घेणारे रिक्षाचालक खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी उचललेल्या या सकारात्मक पावलाचे लोण देशातील शहरोशहरी पोहोचून श्रमजीवी समाजाची तंबाखूच्या विळख्यातून सुटका झाल्यास निश्चितच अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. अन्यथा ज्या वेगाने आपण सारेच कॅन्सरच्या विळख्याने वेढले जात चाललो आहोत ते भयावहच आहे. खारघर शहरामध्ये ‘स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् व्याधितस्य व्याधीपरिमोक्षणम्’ म्हणजेच जो स्वस्थ आहे त्यांचे स्वास्थ्यरक्षण व जो रुग्ण आहे त्यांचे व्याधी दूर करण्यासही कटीबद्ध या ब्रीदवाक्याने ‘धन्वंतरी आरोग्यदूत सेवा’ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे. यात कॅन्सरने पीडित रुग्णांना रूग्णालयातील उपचार तसेच इतर सोयी-सुविधा आणि रुग्णाला रोगाशी लढण्याची ताकद निर्माण व्हावी म्हणून सर्वतोपरी सहाय्य देण्याचे काम केले जाते. कॅन्सरसारख्या रोगाशी मुकाबला करण्यासाठी काही तरूण मंडळींनी एकत्र येऊन सुरु केलेले हे काम उल्लेखनीय आहे.