Breaking News

नवीन पनवेलमधील भुयारी मार्गाला महावितरणच्या टॉवरचा अडथळा

पनवेल ः प्रतिनिधी

नवीन पनवेलमधून जुन्या पनवेलमध्ये (तक्का) जाण्यासाठी रेल्वेचे सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास येत असताना त्याला महावितरणच्या टॉवरमुळे अडथळा निर्माण झाला आहे. सदर टॉवर बाजूला करण्यात येईपर्यंत भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नसल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून मिळाली आहे. त्यामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळण्यासाठी पावसाळा जाण्याची वाट पाहावी लागेल असे चित्र दिसत आहे.  

नवीन पनवेलमधील सेक्टर 15,15ए, पोदी नं. 1 व विचुंबे या भागातून तक्कामार्गे राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदीजवळील रेल्वे गेट ओलांडून किंवा एचडीएफसी सर्कलच्या पुलावरून जावे लागते. या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे या भागात भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती. या भुयारी मार्गासाठी 10 कोटींपेक्षा जास्त खर्चाला मंजुरी मिळून ठेकेदाराला दिलेल्या टेंडरमधील कालावधीप्रमाणे मे 2018मध्ये काम पूर्ण होणे गरजेचे होते, पण डिसेंबर 2017पासून काम बंद पडले होते. कारण भुयारी मार्गासाठी  तयार करण्यात आलेले सिमेंट ब्लॉक रेल्वे लाइनखाली टाकण्यासाठी कोकण रेल्वेमार्गावर ब्लॉक घेणे आवश्यक होते. तो मिळत नसल्याने काम बंद पडले होते. याबाबत नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि तेजस कांडपिळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती दिली असता आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदर काम सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन काम मार्गी लावले होते. त्यानुसार आता ब्लॉक रेल्वे लाइनखाली टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

गाढी नदीच्या बाजूने हा भुयारी मार्ग असून मार्गाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. तक्का बाजूला रस्त्यासाठी भरावाचे काम सुरू आहे, पण त्या बाजूला असलेले महावितरणचे टॉवर बाजूला केल्याशिवाय

दोन मार्गांपैकी एकही मार्ग सुरू करणे शक्य नसल्याने आता रेल्वेचे अधिकारी महावितरणच्या अधिकार्‍यांना त्याबाबत विनंती करीत असल्याचे समजते. लवकरच आमची त्यांच्याबरोबर बैठक होणार असल्याचे

रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे ही बैठक होऊन पावसाळ्यापूर्वी हा टॉवर न हलवल्यास दिवाळीपर्यंत या मार्गाचे काम रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply