अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघात सध्या 371 मतदान केंद्र असून आणखी 4 मतदान केंद्र नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहेत. टिटवी, म्हसाडी, गायचोळ आणि रूईशेत गावठण अशी चार नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे या वेळी 375 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येईल, अशी माहिती अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी दिली. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पोवार यांनी गुरुवारी (दि. 26) पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. अलिबाग विधानसभा मतदारसंघात अलिबाग व मुरूड हे दोन तालुके, तसेच रोहा तालुक्यातील चणेरा महसूल मंडळाचा समावेश आहे. या मतदारसंघात टिटवी, म्हसाडी, गायचोळ आणि रूईशेत गावठण अशी चार नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे या वेळी 375 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येईल, अशी माहिती शारदा पोवार यांनी दिली. या मतदारसंघात 2 लाख 93 हजार 962 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यातील अलिबाग तालुक्यात 2 लाख 6 हजार 907, मुरूड तालुक्यात 63 हजार 467 मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 45 हजार 919 इतकी असून महिला मतदारांची संख्या 1 लाख 48 हजार 43 आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार अधिक आहेत. 1 हजार 697 दिव्यांग मतदार असून त्यात अंध 166, मूकबधिर 166, अस्थिव्यंग 571 व इतर 794 मतदारांचा समावेश आहे. यातील अंध मतदारांना ब्रेललिपीतील मतपत्रिका पुरवल्या जाणार आहेत. एकूण मतदारांपैकी 2 लाख 86 हजार 149 मतदारांना निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पुरवण्यात आले आहे, तर 7 हजार 813 मतदारांना ओळखपत्र देणे बाकी आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांसह 2 हजार 534 कर्मचारी, अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 42 क्षेत्रीय अधिकारी असतील. अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, मुरूडचे तहसीलदार गमन गावीत व मुरूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमित पंडित हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 5 आचारसंहिता पथके, 5 भरारी पथके, तर मांडवा, पोयनाड, साळाव आणि कुदे येथे चार स्थिर सर्वेक्षण पथके तैनात असतील. याशिवाय पाच व्हिडीओ सर्वेक्षण व 1 व्हिडीओ पाहणी पथक सज्ज असेल. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. हद्दपारीचे 9 प्रस्ताव आले असून, दोन जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वरसोली येथील प्राथमिक शाळेत आदर्श मतदान केंद्र असेल. तेथे मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाईल, तर आरसीएफ शाळेतील दोन मतदान केंद्र शक्ती मतदान केंद्र असतील, तेथे सर्व अधिकारी, कर्मचारी महिला असतील. एक दिव्यांग संचलित मतदान केंद्रही असणार आहे. याशिवाय निवडक मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंटही असतील. ही सर्व मतदान केंद्र सजवण्यात येणार आहेत, अशी माहिती शारदा पोवार यांनी या वेळी दिली.