Breaking News

फाफडा पॉलिटिक्स

येत्या 10 जानेवारीस शिवसेनेतर्फे गुजराती बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला खुद्द शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या निमित्ताने मुंबईत होर्डिंगबाजी सुरू झाली असून, जलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा अशी घोषणा देण्यात येत आहे. हे सारे पाहून मुंबईतील मराठी माणूस सोडाच गुजराती बांधवांसदेखील हसू आल्याशिवाय राहणार नाही. महापालिका निवडणुकांची चाहूल लागली की काही राजकीय पक्षांना वेगळ्याच रंगांचे पंख फुटतात. काय वाट्टेल ते करून मतदारांना आपल्याकडे ओढण्याची राजकीय नेत्यांची लगबग सुरू होते. स्थानिक नेते आपापल्या प्रभागातील वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची नव्याने मोट बांधण्याच्या प्रयत्नांना लागतात. मतदारांना विविध प्रलोभने दाखवण्यास सुरुवात होते. एखाद्या वस्तीमध्ये स्वच्छतागृह बांधून देणे, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वॉटरप्रुफिंग करून देणे, सार्वजनिक बगिच्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बाके उपलब्ध करून देणे अशा अनेक उपक्रमांना जाग येते. गेली पाच वर्षे अजिबात तोंड न दाखवणारा नगरसेवक रस्त्यात दिसला तरी हसून नमस्कार करू लागतो. या नेतेमंडळींचे लोकांना वारंवार दर्शन होऊ लागते. ही तर नुसती सुरुवात असते. जसजसा निवडणुकीचा ज्वर चढू लागतो, तसतशा इतर राजकीय उठाठेवींनाही उधाण येते. मुंबईतील गुजराती बांधवांना लुभावण्याचे सत्ताधारी शिवसेनेचे प्रयत्न असल्याच खटाटोपांमध्ये मोडतात. याच शिवसेनेतर्फे वरळी मतदारसंघात निवडणुकीच्या वेळी केम छो वरळी अशी पोस्टर झळकवण्यात आली होती. शिवसेनेचे हे हृदयपरिवर्तन सत्तेच्या ऊबेमुळे झाले आहे हे सांगण्यासाठी कुठल्या राजकीय पंडितांची गरज नाही. वर्षभरापूर्वीपर्यंत हा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून हिंदुत्वाचे गोडवे गात होता. सत्तेसाठी त्याने हिंदुत्वालादेखील तिलांजली दिली. गुजराती बांधवांबद्दल शिवसेनेची मूळची मते काय आहेत हे सर्वश्रुत आहे. एकेकाळी मुंबई तुमची, भांडी घासा आमची या उपरोधिक घोषणेसह शिवसेनेने अमराठी भाषिकांविरुद्ध उभा दावा मांडला होता. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत असून त्याला बदलापूर-अंबरनाथ किंवा वसई-विरारपर्यंत हद्दपार व्हावे लागत आहे. याला कारणीभूत मुंबईवर अतिक्रमण करणारे अमराठी भाषिक आहेत असा शिवसेनेचा दावा होता. मराठी माणसाच्या मुंबईतील तडीपारीला जे अमराठी भाषिक कारणीभूत आहेत त्यात गुजराती बांधवांचा वाटा अधिक असल्याचे शिवसेनेचे नेते वारंवार सांगत होते. महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच शिवसेनेने आपला पूर्वीचा पवित्रा बदललेला दिसतो. भारतीय जनता पक्षाने नेहमीच बेरजेचे समाजकारण केले. अमका मराठी, तमका गुजराती, फलाणा उत्तर भारतीय अशी वर्गवारी भाजपने आवर्जून टाळली. साहजिकच भाजपची मतदारसंख्या वाढत गेली. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या या पारंपरिक मतदाराला, म्हणजेच अमराठी भाषिक मुंबईकरांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी शिवसेनेने चापलुसीचे राजकारण सुरू केले आहे. त्यातूनच गुजराती बांधवांच्या मेळाव्यासारखे स्वार्थी उपक्रम राबवले जात आहेत. गुजराती बांधवांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याला कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. अशा प्रकारचे बेरजेचे राजकारण सर्वच पक्षांनी करायला हवे. मुद्दा उपस्थित होतो तो टाइमिंगचा. निवडणुका जवळ आल्यानंतर अचानक असे उपक्रम का सुचतात, हा खरा प्रश्न आहे. शिवसेनेचे हे गुजरातीप्रेम बेगडी आणि निवडणुकीपुरते आहे हे ओळखणे कठीण नाही. मुंबईकर मतदार सुजाण आहे, त्याला पाहिजे ते तो करेलच.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply