Breaking News

पनवेल एसटी आगार कामाच्या प्रतिक्षेत…

गुजरात परिवहन महामंडळाच्या सूरत येथील आगारप्रमाणे पनवेलचे एस.टी. आगार बांधणार असे परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते  या बसपोर्ट मध्ये तळमजल्यावर बस थांबा, प्रवासी विश्राम कक्ष. दुसर्‍या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय तर तिसरा आणि चौथा मजला व्यवसायिकांसाठी असे नियोजन केले आहे. या कामाची सुरुवात गणपतीनंतर होणार होती. या आगाराच्या कामाची सुरुवात 2019 अर्धे समाप्त आले तरी न झाल्याने आता हे काम होणार की नाही अशी शंका पनवेलकर व्यक्त करीत आहेत

मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलमधून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून येणार्‍या-जाणार्‍या एसटीच्या गाड्या पनवेल स्थानकावर येत असतात त्यातून दररोज हजारो प्रवासी येत-जात असतात. याशिवाय नोकरीधंद्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून हजारो नागरिक या स्थानकातून प्रवास करतात. त्यासाठी पनवेल आगारातून रोज 72 नियते चालवली जातात. त्यापैकी अहमदनगर व शिर्डी ही फक्त दोन लांबपल्ल्याची व 70 गाव खात्यातील आहेत. त्यासाठी 165 चालक व 159 वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोज पाच हजारपेक्षा जास्त गाड्या या स्थांनकात येत असताना महामंडळाने मात्र पनवेल आगाराकडे दुर्लक्षच केले आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद पनवेलकर प्रवाशांच्या बाबतीत एसटीने पाळलेले अद्याप दिसत नाही.   

नैना प्रकल्पामुळे पनवेलचे महत्व वाढले आहे. रेल्वेचे टर्मिनन्स ही पनवेल येथे होणार आहे. त्यामुळे पनवेलचे महत्त्व वाढत आहे. येथील नागरिकरणाच्या वाढण्याचा वेग पाहून येथील एसटी आगाराचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव कॉँग्रेस राजवटीत करण्यात आला. त्यावेळी 80 करोडच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिली नाही. भाजप -शिवसेना युतीचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुजरात परिवहन मंडळाच्या सूरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बिओटी तत्वावर  बांधण्याचा निर्णय घेऊन नवीन 280 करोडचा प्रस्ताव तयार केला.

एसटी महामंडळाने पनवेल आगार आधुनिक पोर्ट बनवण्याचा निर्णय घेतला. बीओटी तत्वावर बांधण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली आहे. यासाठी 230 कोटी रुपये खर्च येणार आहे. या एजन्सीचे वास्तु रचनाकार, इंजिनिअर आणि एसटीचे कार्यकारी अभियंता विनीत कुळकर्णी, विभाग नियंत्रक सुपेकर व इतर अधिकार्‍यांनी 17 मे  2018 रोजी पनवेल स्थानकाला भेट देऊन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बस स्थानकाचा आराखडा कसा असेल याची माहिती देण्यात आली. 17 हजार 500 स्क्वे. फुटाचे बस पोर्ट असेल या मध्ये तळमजल्यावर वाहतूक नियंत्रक कक्ष, प्रवासी विश्राम कक्ष आणि बस थांबा, त्यामध्ये 30 फलाटांची रचना केलेली आहे. प्रवासी फलाटावरुन  गाडीच्या दरवाजात विमानेप्रमाणे जातील. प्रवासी आजूबाजूच्या मोकळ्या जागेत जाऊ शकणार नाही. दुसर्‍या मजल्यावर  महामंडळाचे कार्यालय तर बेसमेंटला पार्किंग व दुरूस्ती विभाग. बाजूला अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने असे नियोजन करण्यात आले आहे. बस स्थानकातून रेल्वे स्थानकापर्यंत एव्हीलेटर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन्हीकडे जाणे-येणे सोपे होणार आहे. या कामाला सुरुवात झाल्यापासून 24 महिन्यात काम पूर्ण करायचे आहे काम वेळेत पूर्ण न झाल्यास एजन्सीला मोठा दंड आकारण्यात येणार आहे.

सध्या ज्या जागेत डेपो आहे त्याठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यामध्ये मॉल, पी.व्ही.आर. आणि इतर व्यावसायिक असतील. आपले 30 महिन्याचे शेड्यूल कसे असेल. त्या काळात गाड्या कोठून सोडल्या जातील, कोणत्या अडचणी येतील यावर चर्चा केली. महापालिकेला यासाठी लागणारी मदत आणि आवश्यक ना हरकत दाखले देण्याचे आदेश आमदारांनी संबंधिताना दिले होते. पण मे महिना संपत आला तरी  ठेकेदाराने फक्त महामार्गाच्या बाजूला काही भागात फक्त पत्रे लावून ठेवले आहेत. आम्हाला महानगरपालिकेकडून ना हरकत दाखला अद्याप मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. पालिका आयुक्त ठेकेदाराने वाहतूक पोलिसांचा ना हरकत दाखला सादर केला नसल्याचे सांगतात. आता पावसाळा सुरू होईल त्यामुळे चार महीने काम सुरू होण्याची शक्यता नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने आता 2019 पर्यंत पनवेल आगाराचे काम सुरू होईल का नाही असा प्रश्न पडला आहे.

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply