Breaking News

अटल करंडक एकांकिका स्पर्धेतील मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीला सुरुवात

पनवेल : प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी (दि. 24) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात सुरुवात झाली.
या वेळी दिग्दर्शक, अभिनेते व लेखक दीपक पवार, लेखक व अभिनेते राहुल वैद्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे खजिनदार अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, चिन्मय समेळ, ओंकार सोष्टे यांच्यासह सीकेटी महाविद्यालय व टीम अटल करंडकचे सदस्य व कलावंत उपस्थित होते. 24 ते 27 नोव्हेंबर या चार दिवसांमध्ये 45 संघ आपल्या एकांकिका सादर करून अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
नाट्यचळवळ वृद्धींगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे चालत रहावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकीका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली.
दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे ही स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्पर्धकांना यंदाही भरघोस रकमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply