रब्बी हंगामात यशस्वी प्रयोग
रोहे : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात कडधान्याचा प्रयोग करीत मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत. कडधान्याला चांगला भाव मिळत असल्याने दिवसेंदिवस हे क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पूर्वी उत्तम दर्जाचे भातपीक तयार होत असे, मात्र वाढते औद्योगीकरण व शेतीबद्दल अनास्थेमुळे रब्बी हंगामात भातपीक कमी झालेले आहे. त्या ऐवजी काही शेतकरी कडधान्याची लागवड करू लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कमी खर्चात घेतले जाणार्या वाल, हरभरा, मुग, चवळी, मटकी, मसूर आदी कडधान्यांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे शेताच्या बांधावरही तुरीचे पीक घेतले जाते.
रोहा परिसर, घोसाळे, चणेरा, निडी तर्फे अष्टमी, कोलाड, आंबेवाडी व नागोठणे या परिसरात कडधान्याची लागवड केली जाते. रब्बी हंगामात सर्वांत जास्त वाल, त्या खालोखाल चवळी, हरभरा, मूग, उडीद, मसूर, मटकी व अन्य कडधान्य घेतले जाते. वालाला पोपटीसाठीही मोठी मागणी असते. या वर्षी रब्बी हंगामात कडधान्याची पेरणी पूर्ण झाली असून यात वाल 1547.50 हेक्टर क्षेत्रावर, हरभरा 99.50 हेक्टर, मुग 147.22 हेक्टर, चवळी 163.55 हेक्टर, मटकी 112.35 हेक्टर आणि मसुरची 5.60 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
शासनाकडून बियाणे उपलब्ध झाले असल्याने या वर्षी मुग, चवळी, हरभरा क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. रोहा तालुक्यात कडधान्याची लागवड झाली असून त्याचे उगवण उत्तम आहे. पिकावर कोणत्याही प्रकारच्या कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेले दिसून येत नाही.
-महादेव करे, रोहा तालुका कृषी अधिकारी