अलिबाग : जिमाका
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, कार्यकारी अभियंता अक्षय पाटील, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा कार्यकारी रत्नशेखर गजभिये यांच्यासह अन्य सदस्यांनी अलिबाग तालुक्यातील खानाव तसेच मुरूड येथील नांदगाव व चोरढे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 व गुणवत्तापूर्ण शिक्षण निधीतून आदर्श शाळा निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून भौतिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरण स्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण, आनंदाची शिक्षण इत्यादी उद्दिष्टांवर कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी खानाव तसेच नांदगाव व चोरढे येथील प्राथमिक शाळांना भेट दिली. या वेळी शिक्षणाधिकारी गुरव यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक विकास अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांची स्तुती करून या कामांकरिता जिल्हा परिषदेमार्फत सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान शिक्षणाधिकारी गुरव यांनी शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी केली. शाळेच्या गुणवत्तावाढीच्या उपाययोजनांसंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित शिक्षण समिती पदाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याशी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या (तडढऋ) आराखड्यात घेण्यात येणार्या कामांबाबत चर्चा करून पोषण आहाराची गुणवत्ता व शाळेसंबंधीत बाबींची तपासणी केली. या वेळी संबंधित तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच ग्रामस्थ
उपस्थित होते.
दर्जेदार शिक्षण हे शास्वत विकासाचे एक महत्त्वाचे ध्येय्य आहे. 21 व्या शतकाची आव्हाने सक्षमपणे पेलू शकणारा विद्यार्थी निर्माण करणे, यासाठी शासनाच्या प्रमुख कार्यक्रमात शिक्षण हा विषय प्राधान्यक्रमावर असतो. या अभियानात प्रामुख्याने शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, आनंददायी शिक्षण आणि पर्यावरण पूरक शाळा या पाच महत्त्वपूर्ण विषयांवर काम सुरू आहे. या कामास गती देण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक विकास अभियानातर्फे मागील वर्षी रायगड जिल्ह्यातील चार शाळांकरिता कामे करण्यात आलेली होती. यावर्षीदेखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सहकार्याने अलिबाग आणि मुरूड तालुक्यातील प्रत्येकी दोन व सुधागड तालुक्यातील एक अशा एकूण पाच शाळांची निवड करण्यात आली आहे.