Breaking News

मुरूड तालुक्यात कडधान्य पेरणीची लगबग

मुरूड : प्रतिनिधी
यंदा पाऊस लांबल्याने मुरूड तालुक्यातील गरव्या, निमगरव्या भाताची कापणी नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत सुरू होती. भात पीकाची कापणी झाल्यानंतर रब्बी हंगामात कडधान्यांचे उत्पन्न घेतले जाते. मात्र यंदा शेतात अजूनही पाणी असल्यामुळे कडधान्यांची लागवड हळूहळू केली जात आहे.
मुरूड तालुक्यात भातशेती क्षेत्र 3300 हेक्टर असले तरी 3200 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली गेली. बागायती क्षेत्र सोडले तर तालुक्यात रब्बी हंगामात दुपिकी जमिन क्षेत्र नगण्य म्हणावे लागेल. भात शेती उलगल्यानंतर तालुक्यातील शेतकरी कडधान्याची लागवड करतात. समुद्र किनार्‍यालगतच्या खार जमिनीवर वाल, चवळी, मूग व हरबरा यासारखे कडधान्ये पारंपारिक पद्धतीने घेतले जाते. या पिकांना अल्प प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. विशेषतः थंडीच्या मोसमात रात्रीच्या वेळी पडणार्‍या दवांमुळे कडधान्याला आवश्यक पाणी मिळते. भात शेतीची कामे उरकल्याने तसेच थंडीच्या मोसम सुरू झाल्याने मुरूड तालुक्यातील शेतकर्‍यांची कडधान्ये पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही शेतात पाणी असल्याने कडधान्यांची लागवड हळूहळू केली जात आहे.
मुरूड तालुक्यात कडधान्यांपैकी मुख्यत्वे वालाचे उत्पादन घेतले जाते. भातशेती आटोपल्यानंतर वालाची पेरणी केली जाते. स्थानिकांसह पर्यटकांची पोपटी पार्टीसाठी गावठी वालांना मोठी मागणी असते. वालाच्या शेंगा सकवून वाल तयार करतात.
कडवे वाल बाजारात चढ्या भावाने विकले जातात. वालाच्या बिरड्याची आमटी हा पदार्थ जेवणात लज्जत आणतो.
यंदा भात कापणी उशीरा झाली असून कडधान्य पेरणी नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात झाली आहे. त्यामुळे वालाच्या शेंगा उन्हाळ्यात उपलब्ध होणार आहेत. गतवर्षी ओल्या शेंगांचा भाव 100 ते 150 रु. पायली इतका होता. तर सुके वाल 400 रु. पायलीने विकले गेले.
-मनोज कमाने, शेतकरी,खार अंबोली, ता. मुरूड

 

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply