Breaking News

उरणमध्ये गोवरचा संशयित रुग्ण

आरोग्य विभाग सतर्क; जनजागृतीसह लसीकरणावर भर

उरण ः रामप्रहर वृत्त

कोरोनानंतर आता गोवरची साथ पसरली आहे. यामध्ये उरण तालुक्यातील एक संशयित आढळून आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे. गोवरच्या साथीमुळे सध्या नागरिकांसमोर नवीन संकट आले आहे. ही साथ पसरू नये याकरीता आरोग्य विभागाकडून विविध उपायोजना राबविल्या जात आहेत, मात्र सावधानता म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. नागरिकांना गावागावातून आशासेविकांकडून सूचना व जनजागृती केली जात आहे. उरणमध्ये एक गोवर संशयित आढळला असून त्याची तपासणी केली जात आहे. तपासणीनंतर त्याच्यावर उपचार केले जाणार असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गोवरची लक्षणे असल्यास खासगी रुग्णालयानेही रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोवरचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लसीकरणाविषयी जनजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातदेखील गोवरने शिरकाव केला आहे. पनवेल, नवीन पनवेल, तक्का, रोहिदास वाडा परिसरात गोवरचे रुग्ण सापडले आहेत. 15 संशयितांचे नमुने तपासणीसाठी हापकीन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांनी दिली. ज्या मुलांचे लसीकरण झाले नाही त्यांचे त्वरित लसीकरण करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. गोवर आजारासंदर्भात संशयित रुग्ण अथवा याबाबत शंका असल्यास नागरी आरोग्य केंद्रात भेट देण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply