Breaking News

गेटवे ते घारापुरी सागरी परिक्रमा; ज्ञानेश्वरी वाचन व हरिपाठ पठण

उरण : प्रतिनिधी  : सालाबादप्रमाणे घारापुरी बेटावर पाच दिवसांचा सत्संग सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. बालयोगी अद्भुतानंंद महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविवारपासून ते बुधवारपर्यंत असे सलग पाच दिवस सुरू असलेल्या सोहळ्यात सोमवारी बेटावरील हजारो भाविकांनी  गेटवे  ऑफ इंडिया मुंबई ते घारापुरी दरम्यान सागरी परिक्रमेतून भाविकांनी ज्ञानेश्वरी वाचन व हरिपाठाचा आनंद लुटला, तसेच सागराचे पूजनही केले.

समाज युवक मंडळ आणि घारापुरी द्वीप विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारपासून सलग पाच दिवस सत्संग सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी राजबंदर येथील गावदेवी मंदिरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी गेटवे ऑफ इंडिया मुंबई ते घारापुरी दरम्यान सागरी परिक्रमेतून ज्ञानेश्वरी वाचन व हरिपाठाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोमवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या सागरी परिक्रमेतून  ज्ञानेश्वरी वाचन व हरिपाठाच्या सोहळ्याचा हजारो भाविकांनी आनंद लुटला.

या वेळी भाविकांनी सागराची पूजाही केली. मंगळवारी रात्रीपर्यंत शेतबंदर येथील श्री शंकर मंदिरात भजन, कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार आहे, तर बुधवारी मोराबंदर येथे श्री सद्गुणेश्वर मंदिरात भजन कीर्तनासह दीपोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये शिवमंदिरात दिव्यांची रोषणाई केली जाणार आहे. गुरुवारी राजबंदर येथील श्री दत्त मंदिरात काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर या पाच दिवसांच्या सत्संग सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

घारापुरी बेटावर सुरू झालेल्या या अनोख्या धार्मिक सोहळ्यात घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य भरत पाटील, मंगेश आवटे, सदस्या ज्योती कोळी, मीना भोईर, सुभद्रा शेवेकर, सोमेश्वर भोईर, उपशाखा प्रमुख सुरेश घरत, विजय पांचाळ, युवासेना शाखा अध्यक्ष विजेंद्र घरत, ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply