खारघर : प्रतिनिधी : तळोजा औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी मत्स्यशेतीत शिरल्यामुळे शेतकर्यांचे शेकडो मासे मेल्याची घटना कोपरा गावाजवळ घडली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडल्यामुळे भरती दरम्यान प्रदूषित पाणी शेतात शिरल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
तळोजा एमआयडीसी परिसरात जवळपास लहान मोठे असे 850 कारखाने आहेत. तळोजा एमआयडीसीमधील काही कारखान्यांचे रसायनमिश्रित दूषित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट खाडीत सोडले जाते आणि त्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना नेहमीच होत आहे, त्या विरोधात नागरिकांकडून अनेक आंदोलने छेडली गेली. अनेक वेळा ही बाब एमआयडीसी व प्रदूषण मंडळाच्या नजरेत आणून दिलेली आहे, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई व उपाययोजना न होता सर्रास रसायन मिश्रित दूषित पाणी खाडीत सोडले जाते.
शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात दूषित पाणी खाडीत सोडण्यात आल्यामुळे खाडीतील पाणी शेतात घुसले. कोपरा गावाजवळ खाडीला लागून कान्हा भोईर यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे शेतातील अनेक माशांचा मृत्यू झाला. शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. शेतकर्याने ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रभाग समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक नरेश ठाकूर, रामजी बेरा, दीपक शिंदे, अजय माळी, मत्स शेतकरी कान्हा भोईर आदींनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. संबंधित विभागाकडे या प्रकाराची तक्रार करण्यात येणार असून खाडीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सभापती शत्रुघ्न काकडे यांनी दिले.