गोरठण ग्रामस्थांनी रचला इतिहास; ग्रामपंचायत बिनविरोध
खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यात चौदा ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे. सरपंच थेट निवड असल्याने हौशेनवशांनादेखील सरपंचपदाची स्वप्न पडत आहे. खुर्चीसाठी साठमारी सुरू असताना तालुक्यातील गोरठण ग्रामस्थांनी थेट सरपंचासह नऊ सदस्यांची बिनविरोध निवड करित एक आदर्श घालून दिला आहे.
– बिनविरोध निवड झालेले उमेदवार
किशोर मोतीराम पाटील : सर्वसाधारण (सरपंच)
रमेश जनार्दन पाटील : सर्वसाधारण (सदस्य)
सचिन राजेंद्रप्रसाद वर्मा : सर्वसाधारण (सदस्य)
सारिका किशोर जाधव : सर्वसाधारण महिला (सदस्य)
प्रतीक्षा कमलाकर चव्हाण : सर्वसाधारण महिला (सदस्य)
पूजा रणजीत पाटील : सर्वसाधारण महिला (सदस्य)
आरती हरेश पाटील : सर्वसाधारण महिला (सदस्य)
रोशन दत्तात्रय खरीवले : सर्वसाधारण (सदस्य)
रामदास मोरेश्वर काईनकर : सर्वसाधारण (सदस्य)
शिल्पा दीपक झेमसे : ना. म. प्र. महिला (सदस्य)
म्हसळ्यात 13पैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध
म्हसळा : तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर म्हसळा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाची निवड बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. म्हसळा तालुक्यातील खरसई, काळसुरी, कणघर, कांदळवाडा, निगडी आणि फळसप या सहा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. रेवळी ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती करिता राखीव असून तेथे थेट सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. उर्वरित तोंडसुरे सरपंच पदासाठी चार, तोराडी सरपंच पदासाठी दोन, देवघर सरपंच पदासाठी सहा, घोणसे सरपंच पदासाठी पाच, लेप सरपंच पदासाठी चार आणि संदेरी सरपंच पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी तोंडसुरे येथे आठ, तोराडी येथे 15, देवघर येथे सहा, घोणसे येथे 10, लेप येथे 11, संदेरीत 20 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या सहा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी महाविकास आघाडी विरोधात शिवसेना शिंदे गट, भाजप, शेकाप अशी लढत होण्याची शक्यता आहे.
रोह्यात थेट सरपंचपदासाठी 28, तर 37 सदस्यपदासाठी 107 उमेदवारी अर्ज दाखल
रोहे : तालुक्यात तळवली तर्फे अष्टमी, खैरेखुर्द, पुई, पहूर आणि दापोली या पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर थेट सरपंचपदासाठी 28 तर 37 सदस्यपदासाठी 107 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. रोहा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तळवली तर्फे अष्टमी सहा, खैरेखुर्दमध्ये सात, पुईमध्ये सहा, पहुरमध्ये चार आणि दापोलीमध्ये पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाच्या एकूण 37 जागांसाठी 107 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये तळवली तर्फे अष्टमीमधील 23, खैरेखुर्दमधील 22, पुईमधील 25, पहुरमधील 16 आणि दापोलीमधील 21 उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. या उमेदवारी अर्जांची सोमवारी (दि. 5) छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख 7 डिसेंबर असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. 17 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
कर्जतमध्ये सरपंचपदाचे 41, सदस्यपदाच्या 69 जागांसाठी 244 नामनिर्देशनपत्र दाखल
कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील मांडवणे, कळंब, उक्रूळ, दहिवली तर्फे वरेडी, वावळोली, कोंदिवडे आणि वेणगाव या सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यासाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत सात थेट सरपंचपदासाठी 41 तर 69 सदस्य पदांसाठी 244 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहेत.नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत मांडवणे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी सहा तर सात सदस्यांसाठी 27 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. कळंब ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी पाच तर 13 सदस्यांसाठी 49 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. उक्रुळमध्ये सरपंच पदासाठी पाच तर नऊ सदस्यांसाठी 25 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. दहिवली तर्फे वरेडीमध्ये सरपंच पदासाठी सहा तर 11 सदस्यांसाठी 34 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. वावळोलीमध्ये सरपंच पदासाठी सात तर नऊ सदस्यांसाठी 17 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. कोदींवडेमध्ये सरपंच पदासाठी सहा तर नऊ सदस्यांसाठी 36 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत आणि वेणगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी सहा तर 11 सदस्यांसाठी 56 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. दाखल नामनिर्देशन पत्रांची सोमवारी (दि. 5) छाननी होणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर असून, त्यानंतर निवडणुकीच चित्र स्पष्ट येईल आणि प्रचाराला वेग येणार आहे.