Breaking News

रायगड जिल्ह्यात किशोरवयीन मुलांच्या लसीकरणास प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 3) किशोरवयीन (15 ते 18 वयोगट) मुलामुलींच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला. त्याला युवापिढीकडून चांगला प्रतिसाद मिळाला. लसीकरण होणार असल्याने मुलामुलींनी पहिल्याच दिवशी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. सुमारे दीड लाख मुलामुलींना याचा लाभ होणार आहे. अलिबाग येथील डोंगरे हॉलमध्ये झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात अनुज शिगवण याला कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात 14 व पनवेल महापालिका क्षेत्रात 10 ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच मुलांनी लसीकरण केंद्रावर पालकांसह हजेरी लावली होती. तेथे आलेल्या बहुतांश मुलांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते त्यांचे केंद्रांवर रजिस्ट्रेशन करण्यात आले. लसीकरणासाठी जिल्ह्यात 15 ते 18 या वयोगटातील मुलामुलींची अंदाजित संख्या एक  लाख 45  हजार 383  इतकी आहे. या सर्वांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रावर सकाळी 9  ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी कोविड संकेतस्थळावर 1 जानेवारीपासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात केंद्र वाढवण्यात येतील. पुढील दोन ते अडीच महिन्यांत या वयोगटातील लसीकरण पूर्ण करण्याचा आराखडा आम्ही तयार केला आहे.

-डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड

 

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. अशा वेळी सरकारने घेतलेला निर्णय आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगला आहे. आम्हा मुलांनाही लसीकरणाची उत्सुकता होती. आज माझ्यासह अनेक मित्रांनी लस घेतली. ही लस सुरक्षित आहे.

-अनुज शिगवण, लाभार्थी, अलिबाग.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply