तळोजात कब्रस्तान कामाचे भूमिपूजन
तळोजा : रामप्रहर वृत्त
सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष काम करीत आहे. येणार्या काळात या परिसरात निर्माण होणार्या सर्व गरजा पूर्ण करणे ही आम्ही आमची जबाबदारी समजून त्या जबाबदारीतून आम्ही काम करीत राहणार आहोत. सर्वांच्या हितासाठी काम करण्यासाठी सातत्याने तत्पर राहू, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते तळोजात बोलत होते.
पनवेल महापालिका हद्दीत नागरिकांना असणार्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्या अंतर्गत माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे आणि माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, भाजप नेते निर्दोश केणी यांच्यासह विविध संस्थांच्या पाठपुराव्यामुळे तळोजा फेज 1, सेक्टर 15मध्ये महापालिकेच्या माध्यमातून दोन कोटी 11 लाख 68 हजार 959 रुपयांचा निधी वापरून कब्रस्तान बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 17) झाले.
या कार्यक्रमास माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, पापा पटेल, भाजप नेते निर्दोश केणी, मुनाफ पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, या परिसरात येणार्या काळात भुयारी गटार योजना, पिण्याच्या पाण्याची योजना या कामांसाठी निधी मंजूर झाला असून लवकर याचा आदेशसुद्धा शासनामार्फत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे समाजभवनासाठीही येणार्या काळात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.