Breaking News

खोपोलीमध्ये उद्यानाच्या नुतनीकरणाची मागणी

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली नगरपालिका मालकीचे व शास्त्रीनगर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भगवान महावीर उद्यानचे वैभव हरवल्याची स्थिती बनली आहे. उद्यानाच्या नुतनीकरणाची मागणी अनेक संघटना करीत आहेत. 2016 मध्ये या उद्यानाचे विस्तारीकरण व नूतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर दर दोन वर्षांनी या उद्यानावर नगरपालिका कडून जवळपास 12 ते 15 लाख निधी खर्च केला जात आहे. एका बाजूला नियमित खर्च होऊनही उद्यानाची स्थिती मात्र सुधारण्याऐवजी बिघडत आहे. मागील दोन वर्षे कोरोना चे कारण पुढे करून या उद्यानाच्या देखभाल व डागडुजीकडे दुर्लक्ष झाले  आहे. नगरपालिकेकडून सुरू असलेला निष्काळजीपणा व  दुर्लक्षमुळे या उद्यानाचे वैभव हरपले आहे. महावीर उद्यानात बसविण्यात आलेली खेळणी ज्यात मिनी ट्रेन, लहान मुलांसाठीचे विविध खेळणे, पाळणे व अन्य साहित्य सामुग्री  बंद पडली आहे किंवा तुटलेल्या अवस्थेत भग्न स्थितीत पडून  आहे. येथील हिरवाईला वेळेवर पाणी मिळत नसल्याने हिरवाई सुखलेल्या स्थितीत आहे. लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेले कारंजे व अन्य शोभेचे साहित्य ही दुर्लक्षित बनले आहे. एकेकाळी बच्चे कंपनी व थोरामोठ्यांसाठी प्रमुख केंद्र असलेल्या महावीर उद्यानमधील सोयीसुविधा नष्ट होत आहेत. महावीर उद्यानाची वर्तमान अवस्था बघता या उद्यानाच्या नूतनीकरण व सुशोभीकरण साठी खर्च करण्यात आलेला  लाखोंचा  निधी वाया गेल्याची स्थिती आहे. कोरोना संकट व त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे महावीर उद्यानाचे नुकसान झाल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. येथील महागड्या खेळणी व अन्य साहित्याची झालेली मोडतोड व नुकसान निव्वळ नगरपालिकेकडून झालेल्या दुर्लक्षा मुळे झाले असल्याचे स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधीचे म्हणणे आहे.  दरम्यान, महावीर उद्यानाची बनलेली दुरवस्थेमुळे खोपोली जैन संघटना व व्यापारी संघटना ही संतप्त असून लवकरात लवकर या उद्यानाला गत वैभव प्राप्त होण्याची मागणी खोपोली जैन समाज संघटना कडून नगरपालिकेकडे करण्यात येणार  आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply