Breaking News

गांगुली येताच इतिहास घडणार!

मुंबई : प्रतिनिधी

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष होताच भारताच्या क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. बीसीसीआयने ठेवलेल्या डे-नाइट टेस्ट मॅचच्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे 22 नोव्हेंबरपासून कोलकात्यात सुरू होणारी टेस्ट मॅच ही टीम इंडियाची पहिलीच डे-नाइट टेस्ट मॅच असेल. बीसीसीआयने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला डे-नाइट टेस्ट मॅचचा प्रस्ताव पाठवला होता. बांगलादेश हा प्रस्ताव स्वीकारेल, असा विश्वासही गांगुलीने व्यक्त केला होता.

सौरव गांगुली व बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांच्यात यावरून चर्चा झाली. यानंतर हसन यांनी बांगलादेशच्या खेळाडूंशी चर्चा करून डे-नाइट टेस्ट मॅचची घोषणा केली. डे-नाइट टेस्ट मॅच गुलाबी बॉलने खेळविण्यात येते. या मॅचची तयारी करण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी गांगुली आग्रही होता.

अध्यक्ष झाल्यानंतर गांगुलीने मुंबईत कर्णधार विराट कोहली व रोहित शर्माची भेट घेतली. या भेटीत डे-नाइट टेस्ट मॅचबद्दल चर्चा झाली. आम्ही सगळे डे-नाइट टेस्ट मॅचबद्दल विचार करीत आहोत. माझा डे-नाइट टेस्ट मॅचवर विश्वास आहे. कोहलीनेही यासाठी समर्थन दिले. विराट डे-नाइट टेस्टविरोधात आहे, अशा बातम्या येत होत्या, पण यात तथ्य नाही. खेळाला पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे आणि हाच पुढचा मार्ग आहे. लोकांनी काम संपवून चॅम्पियन

खेळाडूंना पाहायला आले पाहिजे. हे कधी होईल मला माहिती नाही, पण हे नक्की होईल, असे गांगुली म्हणाला होता.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply