भाजप सांस्कृतिक सेलच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका मालकीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाडेदरांमध्ये 75 टक्के सवलत देण्याचा निर्णय पनवेल महापालिका प्रशासनाने आहे. या कामी भारतीय जनता पक्षाने पाठपुरावा केला होता.
यासंदर्भात 4 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र भाजप सांस्कृतिक सेलच्या पदाधिकार्यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाडेदरात सवलत द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी संबंधित खात्याला यासंदर्भात सुचना केल्याने हा सकारात्मक निर्णय झाला. त्याअनुषंगाने भाजपच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कोविड-19मुळे मराठी नाट्य व्यवसायाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या समस्यांवर मात करत नव्या ताकदीने उभारण्याकरिता महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक खात्याकडून दैनंदिन भाडेदरांमध्ये 75 टक्के सवलत देण्याविषयीचे पत्र महापालिकेस मिळाले होते.त्यास अनुसरून पनवेल महापालिकेकडून याबाबत प्रशासकीय सर्वसाधारण सभेत ठराव पारित करण्यात आला आहे. या ठरावामध्ये पनवेल महापालिका मालकीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मराठी नाटकांकरीता दैनंदिन भाडेदरामध्ये 31 डिसेंबर 2023 पर्यंत 75 टक्के सवलत मंजूर करण्यात आली आहे.
कोरोना काळातही अशा प्रकारची मागणी आम्ही पनवेल मनपाकडे सभागह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. त्या वेळेसही प्रशासनाने 75 टक्के सूट मंजूर केली होती. त्यानंतर दर आकारणी पूर्ववत झाल्याने भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री मुनगुटीवारांकडे झालेल्या बैठकीतून पुन्हा एकदा 75 टक्के सवलत देण्यात येत आहे. यामुळे प्रशासनाचे मी आभार मानतो. -अभिषेक पटवर्धन, अध्यक्ष, सांस्कृतिक सेल, उत्तर रायगड