Breaking News

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांनाही आरोग्य सेवा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड व नॉन कोविड रुग्णांनाही आरोग्यसेवा देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.  
    पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात तत्कालीन परिस्थिती पाहता कोविड रुग्णांवर उपचार करणे गरजेचे होते. त्यामुळे रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी एप्रिल 2020मध्ये हे रुग्णालय कोविड रुग्णालय घोषित केले होते. ते अद्यापपर्यंत कोविड रुग्णालयच असल्याने येथे इतर रुग्णांवर उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे गरजू व गरीब इतर रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन उपजिल्हा रुग्णालयात इतर रुग्णांवरही उपचार करण्यास व त्यांना आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश देण्याची मागणी केली आहे.
     आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत कोविड रुग्णांची संख्या कमी होत असून, अशा परिस्थितीत गरजू व गरीब इतर रुग्णांना आरोग्यसेवा मिळण्यास येणार्‍या अडचणी दूर होण्यासाठी कोविड रुग्णांबरोबरच नॉन कोविड रुग्णांसाठीही वैद्यकीय उपचार व सेवा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्यसेवा उपसंचालक (ठाणे) यांनी 6 जानेवारी 2021 रोजी या रुग्णालयाला भेट दिली असता, येथे कोविड रुग्णांबरोबरच नॉन कोविड सेवा सुरू करण्याबाबत उपजिल्हा रुग्णालयाच्या संबंधित अधिकार्‍यांना सूचित केले होते. त्यामुळे आपण याचा विचार करून आपल्या स्तरावर उचित निर्णय घेऊन तसे आदेश द्यावे, अशी मागणी रायगड जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply