उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर येथील इतिहास संशोधक तथा ज्येष्ठ साहित्यिक वसंत भाऊ पाटील यांचे गुरुवारी (दि. 29) वृद्धत्वाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
वसंत पाटील यांनी शिक्षक म्हणून अध्यापनाचे काम केले. अध्यापन करीत असताना त्यांना साहित्याचा लळा लागला आणि त्यांच्या लेखणीतून, दर्जेदार साहित्य बाहेर पडले. ते इतिहासाचेही गाढे अभ्यासक होते. इतिहास संशोधक व प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांची ओळख होती. याशिवाय त्यांचे मुक्त पत्रकारितेतील लेखन सकस व वास्तवदर्शी होते. विविध व्यक्तिचित्रे त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. वृत्तपत्रातून वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी समीक्षा लेख लिहिले. त्यांना अनेक राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
उरण पूर्व साहित्य संस्थेचे अध्यक्षपद वसंत पाटील यांनी अनेक वर्षे भूषविले होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत व मार्गदर्शनाखाली अनेक साहित्य संमेलने भरविली गेली. चिरनेर जंगल सत्याग्रहाचा नेमका इतिहास त्यांनी ‘चिरनेर जंगल सत्याग्रह 1930’ या ऐतिहासिक पुस्तकातून वाचकांसमोर आणला. याखेरिज त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. कै. वसंत पाटील यांच्या पश्चात पत्नी, कन्या, जावई व नातवंडे असा आप्तपरिवार आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …