कर्जत : प्रतिनिधी
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील टाकवे गावासमोर शुक्रवारी (दि. 30) रात्री अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरून प्रवास करणारे सावळे गावातील दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे सावळे गावावर आणि परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या सुमारास सुझुकी कंपनीचा छोटा टेम्पो (एमएच 46 बीयु 2228) हा त्या वाहनाचा चालक कडाव कडून कशेळेकडे जात होता. त्यावेळी कडाव बाजू कडून कशेळेकडे जाणारी दुचाकी त्या टेम्पोवर आदळली. टाकवे येथील रूस्तम फार्महाउस येथे कडाव बाजुकडुन कशेळे बाजुकडे जाणार्या रोडवर समोरून कशेळे बाजुकडुन कडात बाजुकडे जाणार्या नवीन होंडा शाईन मोटरसायकलला अपघात झाला. त्या अपघातात मोटरसायकल चालक तानाजी धुळे आणि त्या दुचाकीवरून प्रवास करणारा दीपक धुळे यांना लहान मोठ्या गंभीर जखमा झाल्या होत्या. मात्र काही वेळाने त्या दोघांचे मृत्यू या अपघातात झाले असून हे दोन्ही तरुण तालुक्यातील आणि अपघात स्थळापासून तीन किलोमीटर अंतरावरील सावळे गावातील तरुण असल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
दुचाकीला अपघात झालेला असताना त्या अपघाताची कोणतीही माहिती संबंधित टेम्पोचालकाने पोलिसांना दिली नाही आणि तेथून पळ काढला. त्यामुळे स्थानिक संतप्त झाले होते. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी आणि अपघाताची खबर न देता अपघातग्रस्त टेम्पो तेथेच सोडुन पळुन गेल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार ए. एम. वडते करीत आहेत.