कळंबोली : बातमीदार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यावर जर कोणी गरळ ओकत असेल, तर ते पक्ष कदापि सहन करणार नाही. अनंत गीते हे शिवसेनेने भंगारात काढलेले नेते असून ते दोन वर्ष विजनवासात होते, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी कळंबोली येथे गुरुवारी (दि. 23) पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी श्रीवर्धनमध्ये केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटत असून राष्ट्रवादीचे नेते त्यास प्रत्युत्तर देत आहेत. कळंबोलीतील पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहराचे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष शिवदास कांबळे, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दौलत शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रशांत पाटील म्हणाले की, गीते यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांच्या पक्षानेही साधी दखल घेतली नाही, तर शिवसेनेचे काही बडे नेते सुनील तटकरे यांच्याकडे लोटांगण घालून कामे करून घेत आहेत. जिल्ह्यामध्ये आघाडीचा धर्म प्रत्येकानेच पाळावा. जिल्ह्यातील शिवसेनेचे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, तसेच काँग्रेसचे महेंद्र घरत यांनी जरी एकत्र येऊन राष्ट्रवादीशी मुकाबला करण्याचे ठरवले, तरी या तीन्ही महेंद्रवर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे निश्चितच भारी पडतील. रायगडमधील सेना व काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचे वरिष्ठ निश्चितच समजूत घालण्याचा प्रयत्न करतील, असेही वक्तव्य या वेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीकडून करण्यात आले. शिवसेनेच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेताना आम्हीही आघाडीचा धर्म पाळून विकासाची कामे करण्यास सज्ज असल्याचे भीमसेन माळी यांनी या वेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांबद्दल कोणीही गरळ ओकत असेल, तर यापुढे त्यांची गय केली जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर पक्षाच्या माध्यमातून दिले जाईल, असा इशारा या वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांनी दिला.