Breaking News

प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल

नवी करप्रणाली जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलत नवी करप्रणाली जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ व्यासपीठाचे लोकार्पण गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणार्‍यांच्या मनातील भीती दूर होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी या वेळी व्यक्त केला तसेच देशवासीयांना कर भरण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील प्रामाणिक करदाता देशाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावतो. प्रामाणिक करदात्यासोबत देशाचाही विकास होत असतो. आज प्रत्येकाला शॉर्टकट योग्य नसल्याचे लक्षात येत आहे. चुकीचे मार्ग निवडणे उचित ठरत नाही. ती वेळ, काळ निघून गेला आहे. देशभरात नवे बदल होत आहेत. एक काळ होता जेव्हा बदल करण्यासंबंधी खूप चर्चा व्हायची. काही वेळा दबावात किंवा इच्छा नसतानाही निर्णय घेत बदल करण्यात आल्याचे सांगितले जायचे, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही धोरणात्मक बदलाला महत्त्व दिले आहे. प्रत्येकाचा दुसर्‍याशी संबंधही असला पाहिजे याकडे लक्ष देत आहोत.
कराबाबत बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, सहज व्यवसाय करण्यामध्ये भारत आता 63व्या क्रमांकावर आला आहे. यामागे करण्यात आलेले अनेक बदल कारणीभूत आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकदरांचा विश्वास वाढत आहे. कोरोना संकटातही विक्रमी गुतंवणूक होणे याचेच उदाहरण आहे.
ज्या शहरात आपण राहतो तेथील कर विभाग आपल्या सर्व गोष्टी हाताळतो. नव्या व्यासपीठामुळे कर अधिकार्‍याची भूमिका बदलली आहे. जर मुंबईमधील एखाद्या व्यक्तीचे करासंबंधी प्रकरण असेल ते मुंबईतील अधिकारीच हाताळेल असे होणार नाही. ते चेन्नई किंवा इतर शहरातही जाऊ शकते. यामागे फेसलेस टीम असेल. ही टीम कोणती असेल याचा निर्णय संगणक निवड करेल तीच असेल, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
करदात्यांच्या प्रत्येक पैशाचा योग्य वापर करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. सरकारलाही करदाता जागरूक राहतील अशी अपेक्षा आहे. 2012-13मध्ये 0.94 टक्के छाननी होत होती. 2018-19मध्ये हा आकडा 0.26 टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच छाननी होण्याचे प्रमाण जवळपास चार पटीने कमी झाले आहे. याचा अर्थ बदल किती व्यापक आहे हे दर्शवतो. गेल्या सहा ते सात वर्षांत टॅक्स रिटर्न भरणार्‍यांची संख्या अडीच कोटींनी वाढली आहे, पण 130 कोटी लोकसंख्येच्या तुलनेत ही वाढ फार कमी झाली आहे. 130 कोटींपैकी फक्त दीड कोटी लोक कर भरत आहेत. यावर आपण सर्वांनी चिंतन करणे गरजेचे आहे. आपले आत्मचिंतन आत्मनिर्भर भारतासाठी गरजेचे आहे. कररचनेत नाहीत परंतु कर भरू शकतात त्यांनी पुढे येऊन कर भरला पाहिजे. स्वातंत्र्य दिनानिमित्त याचा विचार करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply