Breaking News

रामबागमध्ये संगीतमय कार्यक्रम रंगला

मान्यवरांसह रसिकश्रोत्यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे उभारण्यात आलेल्या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उद्यान अर्थात रामबागमध्ये नवीन वर्षानिमित्त रविवारी (दि. 1) लाईव्ह म्युझिकल इव्हेंट या सुरेल गाण्यांची मैफिल असलेल्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यास श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली निसर्गसौंदर्याचे केंद्रबिंदू बनलेली रामबाग फुलली असून उलवे नोड, नवी मुंबई, पनवेल, उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी वीकेण्डला आपल्या परिवारासह वेळ घालवण्यासाठी रामबागेला पसंती दिली आहे.
दुबईच्या वाळवंटात मिरॅकल गार्डन फुलले. त्याचप्रमाणे न्हावेखाडी येथील चिखलमय जमिनीवर भव्यदिव्य आणि सर्वांगसुंदर रामबाग फुलली आहे. 14 एकर जागेतील या रामबागेत विविध प्रकारची फुलझाडे, तलाव, विद्युत रोषणाई, पदपथ, चिरेबंदी बांधकाम, आसन व्यवस्था, खेळणी, पाळणे, डबल हर्ट आणि स्टोन असे दोन सेल्फी पाँईंट, मचवा, पाण्याचे कारंजे, अशा सर्व बाबी निसर्गप्रेमींना आकर्षित करतात. सायकांळी विद्युत रोषणाई डोळ्यांचे पारणे फेडते. त्याचबरोबर वाहन पार्किंग, सुरक्षा अशा विविध पायाभूत सुविधा या ठिकाणी असल्याने हजारो नागरिक भेट देऊन मनमुराद आनंद घेत आहेत.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या मनमोहक रामबागमध्ये संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने रसिकांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे यांनी परिवारासह या उद्यानाला भेट दिली. या वेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, मंदिर कमिटी अध्यक्ष सी. एल. ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकूर आदी उपस्थित होते. नववर्षाची सुरुवात नयनरम्य रामबागमध्ये संगीतमय कार्यक्रमाने झाल्याने उपस्थित नागरिकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply