Breaking News

फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून चोरी

महिलेला मानपाडा पोलिसांकडून अटक

20 लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त

पनवेल ः वार्ताहर

फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांचेकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तू चोरी करणार्‍या महिलेस मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून पोलिसांनी एकूण 20 लाख 81 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या घटनेतील फिर्यादी महेश कृष्णा पाटील यांची फेसबुकचे माध्यमातून समृद्धी खडपकर (वय 29) या महिलेशी ओळख झाली. महिलेने त्यांना खोणीगांव येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास बोलाविले. हॉटेलमध्ये गप्पा मारताना तिने त्यांचेवर प्रेम करते असे दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला व त्यास लॉजचे खोलीत घेऊन गेली. फिर्यादी हे बाथरुममध्ये गेले असता महिलेने त्यांचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर, सॅमसंग फोल्ड-3 मोबाईल, सोन्याच्या तीन चेन, हातातील सोन्याचे कडे, एक टायटन कंपनीचे घड्याळ असा एकूण चार लाख 75 हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पळ काढला. या महिलेचा कोणताही मोबाईल फोन नंबर अथवा तिचा पत्ता महेश यांच्याकडे नव्हता. महेश यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

घटनेचे गांभीर्य ओळखून मानपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सूचना केल्या. महिलेचा शोध घेतला असता, ती गोवा येथे असल्याचे समजले. पोलिसांनी गोवा येथून समृद्धी खडपकर हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिने अश्याप्रकारे अनेक नागरिकांना गंडा घातल्याची कबुली दिली, तसेच या चोरलेल्या वस्तू तिचा साथीदार बाजारात विकत असल्याचे सांगितले. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गोवा येथून तिचा साथीदार विलेंडर विल्फड डिकोस्टा (वय 34) याला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 16 मोबाईल फोन, दोन घड्याळे, 290 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 20 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply