मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाचे आवाहन; दिशादर्शकाला फासले काळे
पनवेल : रामप्रहर वृत्त
ओल्ड पनवेल असे लिहिलेल्या दिशादर्शकाला मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने तसेच पनवेल शहरावर प्रेम करणार्या तरुणांनी काळे फासले, तसेच पनवेलच्या अस्मितेवर अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवू असा इशारा देण्यात आला.
पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा आहे. अशा या शहराला जुने पनवेल किंवा ओल्ड पनवेल म्हणू नका, तर पनवेल असा उल्लेख करण्यासंदर्भात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेत पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी होते आहेत. पनवेल शहरातील विजय सेल्ससमोरील रस्त्यावर एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएने उभारलेल्या दिशादर्शकावर पनवेल शहराचा ‘ओल्ड पनवेल’ असा उल्लेख केला आहे. यामुळे पनवेलकरांच्या भावना दुखावल्या असून, याविरोधात आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळ आणि पनवेलमधील तरुणांच्या वतीने गुरुवारी (दि. 5) रॅली काढून या दिशादर्शकाला काळे फासण्यात आले, तसेच शहरातील एका मोबाईल शॉपच्या नामफलकावरील अशाचप्रकारे ओल्ड पनवेल असा उल्लेख होता त्यालाही काळे फासण्यात आले. पनवेल शहर हे पनवेलकरांची अस्मिता आहे. त्यामुळे या शहराचा उल्लेख हा नेहमीच पनवेल म्हणूनच केला पाहिजे, असे आवाहन या वेळी सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. असा प्रकार पुन्हा घडल्यास आम्ही आवाज उठवू असा इशारा देण्यात आला.
या वेळी मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, रोशन ठाकूर, प्रवीण मोरबाळे, अमेय देशमुख, विजय शिंदे, जयदीप पाटील, निखिल ठक्कर, संतोष कुंवर, स्वरूप वाणी, प्रथमेश गुडेकर, हृतिक ढगे, राजू पुरोहित यांच्यासह मिडल क्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाचे सदस्य आणि पनवेलमधील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.