नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील महामार्गांसाठी भरघोस निधी जाहीर केला आहे. याआधीही त्यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 2780 कोटींचा निधी मंजूर केला होता. पुणे जिल्ह्यातील एनएच 548-डीडी (वडगाव-कात्रज-कोंढवा-मंतरवाडी चौक-लोणी काळभोर-थेऊर फाटा-लोणीकंद रोड)वर कात्रज जंक्शनवर सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 169.15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सोलापूर विजापूर रोड एनएच 52 (सोलापूर शहर भाग)वर दोन ते चार लेनच्या पुनर्वसन व अपग्रेडेशनसाठी 29.12 कोटी निधी मंजूर झाला आहे, तसेच पूर्णा नदीवर दोन पदरी पुलांच्या कामासाठी व शेगाव-देवरी फाटा एनएच 548 सीच्या कामासाठी 97.36 कोटी निधी मंजूर झाला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-निर्मल रस्ता एनएच 61च्या दोन लेनचे काँक्रिटीकरण व रुंदीकरणासाठी 47.66 कोटी आणि गुहागर-चिपळूण-कराड रोड एनएच 166 ईच्या मजबुतीकरणासाठी 16.85 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. डीबीएफओटी पीपीपीवरील सिन्नर ते नाशिक विभागातील एनएच 50 ते चार लेनच्या विकासासाठी 3.13 कोटी मंजूर केले आहेत.