माणगावात कुणबी जोडो अभियान; नेत्यांचे समाजबांधवांना आवाहन
माणगाव : प्रतिनिधी
रायगडसह कोकणात मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे. तो विखुरला आहे. त्यामुळे समाजाकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे समाजाची उपेक्षा कायमआहे. हक्क, कर्तव्य समजावून सांगत त्यांची जनजागृती करणे गरजेचे आहे. एकट्याने लढून मिळणार नाही. त्यासाठी एकत्रित ताकद निर्माण करणे गरजेचे आहे. कुणबी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज एक संघ राहिला तर आपले प्रश्न सुटतील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कुणबी समाजाने मतभेत बाजूला ठेवून संघटित झाले पाहिजे, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ रायगड जिल्हा कुणबी जोडो अभियान नियोजन प्रमुख ज्ञानदेव पवार तसेच कुणबी समाजोन्नती संघाच्या विविध मान्यवरांनी कुणबी जोडो अभियानात केले. या वेळी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई अध्यक्ष भूषण बरे, कुणबी राजकीय संघटन समिती अध्यक्ष अशोक वालम, कार्याध्यक्ष कृष्णा कोबनाक, कुणबी उच्च अधिकार समिती अध्यक्ष शंकरराव म्हसकर, कुणबी जोडो अभियानाचे नियोजन प्रमुख तथा माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, महादेव बक्क्म, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष उदय कठे, सरचिटणीस शिवराम महाबळे, माणगाव तालुकाध्यक्ष सुभाष भोनकर, सखाराम पोटले, सरचिटणीस विजय भोस्तेकर, सरचिटणीस राजेंद्र खाडे, रमेश मोरे, रामभाऊ टेंबे, काका नवगणे, विपुल उभारे, कुणबी सेवा ट्रस्ट संस्थापक निलेश सत्वे उपस्थित होते. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी राजकीय संघटन समिती यांच्या सहकार्याने 8 ते 15 जानेवारी पर्यत कुणबी जोडो अभियान महाड, पोलादपूर माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा, मुरुड, अलिबाग, पेण, सुधागड, पाली, खालापूर, कर्जत, उरण, पनवेल आदी तालुक्यातून राबविण्यात येत आहे. रथ यात्रा 9 जानेवारी रोजी सकाळी माणगाव तालुक्यातील लोणेरे, गोरेगाव, मढेगाव, उणेगाव, लोणशी, ढालघर फाटा, माणगाव शहर, भाले, भिनाड, इंदापूर, खरवलीफाटा, पेण बोरघर, चरई, साई, चांदोरे अशी करण्यात आली. त्यावेळी माणगाव येथील कुणबी समाज सभागृहात सभा घेतली. या अभियानात समाजाच्या ज्वलंत समस्यांबाबत जनजागृती करुन केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांची सोडवणूक करून घेणे. कुणबी, ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालेच पाहिजे, मुंबईसह कोकणातील कष्टकरी कुणबी, ओबीसी यांना त्यांच्या राहत्या घराखालील जमिन तसेच शेतीसाठी कसत असलेल्या शेतजमिनींची माहिती, हक्क, सातबाराच्या उतार्यावर कब्जेदार सदरी नोंद करण्यात यावी. या आणि इतर समस्यांबाबत कोकणातील कुणबी समाजामध्ये जनजागृती या अभियानातून करण्यात आली.