Breaking News

अंगारकीनिमित्त पालीत भक्तांची मांदियाळी

व्यापार, व्यवसायाला मिळाली मोठी उभारी

पाली ः प्रतिनिधी

नववर्षातील पहिल्या व शेवटच्या अंगारक संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (दि. 10) अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र पाली नगरीत भाविकांनी दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती. पहाटेपासून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. या वेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत होता. रायगड जिल्ह्यासह राज्यातून हजारोंच्या संख्येने दाखल झाले होते.

परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले होते. येथील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तूंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले सुखावले होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ होती. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक विक्रेत्या महिला विक्री करीत आहेत. मंदिरात येणारे भाविक आवर्जून येथून हा रानमेवा खरेदी करतांना दिसले. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

वाहतूक कोंडी; पोलिसांची कसरत

खासगी वाहने, डंपर, लक्झरी वाहनांची ये-जा, अरूंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी सोडवितांना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागली.

देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्तनिवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केला आहे. शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रेलींग, मांडव व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंगदेखील आहे. प्रसादालय खुले आहे. सुसज्ज स्वच्छतागृहदेखील उभारण्यात आले आहेत. -जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट

वर्षातील पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने मोठ्या संख्येने भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. भाविकांची वर्दळ असल्याने व्यवसायदेखील चांगला होत आहे. -मनोज मोरे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर देवस्थान

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply