भाजप नेते आशिष शेलारांचा गंभीर आरोप
मुंबई ः प्रतिनिधी
शर्जिल उस्मानी याने केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्यांनंतर भाजपने त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनेच शर्जिलला पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आशिष शेलार बोलत होते.
शर्जिलला महाराष्ट्र व मुंबईबाहेर पळून जाण्यासाठी मदत करण्याचे पाप महाविकास आघाडीने केले. शर्जिलला पळून जायला दिल्यानंतर व भाजपने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करू म्हणणे म्हणजे पश्चातबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूंना सडलेल्या म्हणणार्या व्यक्तीला वाचवण्याचे काम का केले हे स्पष्ट करावे. शर्जिलने केलेल्या अवमानकारक टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे याचा अर्थ यांचं डोकं ठिकाणावर आहे का? अटक केली जाईल म्हणजे कधी आम्ही मागणी केल्यावर, परंतु एल्गार परिषदेला परवानगीच का दिली, असा संतप्त सवाल शेलारांनी केला आहे.
दरम्यान, भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कलाकारांनीही याची दखल घेत ट्विट केले. भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर भाष्य करीत शिवसेनेला सुनावले आहे. शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो, पण परदेशातून कोणी आपल्या देशातील विषयावर टिप्पणी, बदनामी केली तर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे राऊतांनी जनतेसमोर मांडावे, असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
या वेळी शेलारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली.