Breaking News

मराठी शाळांची अस्तित्व टिकवणे काळाची गरज -ज्ञानेश्वर म्हात्रे

खोपोली : प्रतिनिधी
देशात आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळा दिवसेंदिवस वाढत आहेत. हे अतिक्रमण थांबविण्यासाठी सर्वांची एकजुट आवश्यक आहे. आज मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या शाळा टिकविणे काळाची गरज आहे व यासाठी विधान परिषदेत तुमचा हक्काचा प्रतिनिधी पाठविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शुक्रवारी (दि. 20) केले. ते खोपोली येथे बोलत होते.
महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शुक्रवारी सकाळी खोपोली येथे केएमसी महाविद्यालय, जनता विद्यालय, शिशु मंदिर, तसेच सह्याद्री विद्यालय या ठिकाणी भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला व निवडून देण्याचे आवाहन केले. मागील निवडणुकीत काही मतांच्या फरकाने पराभूत झालो असलो तरी शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमी अग्रेसर राहिलो. आंदोलने केली आणि यापुढेही आपले अनेक प्रलंबित प्रश्न सोडवायचे आहेत. यासाठी मला आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावे, अशी साद त्यांनी घातली.
या प्रचार दौर्‍यात उमेदवार म्हात्रे यांच्यासमवेत पनवेलचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे खोपोली प्रभारी सुनील घरत, बदलापूरचे नगरसेवक प्रकाश मर्गज व कार्यकर्ते, तसेच भाजप खोपोली सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, जिल्हा कामगार समन्वयक सूर्यकांत देशमुख, वैद्यकीय सेलचे डॉ. बबन नागरगोजे, माजी शहराध्यक्ष विजय तेंडुलकर, महिला मोर्चाच्या सरचिटणीस अश्विनी अत्रे, शहर चिटणीस गोपाळ बावस्कर, कार्यकर्ते संजय म्हात्रे, हिम्मतराव मोरे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष संदीप पाटील, कार्यकर्ते राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या देशातील सशक्त नवीन पिढी निर्माण करण्याचे काम शिक्षकांच्या हातात आहे. शिक्षकांनी संघटित राहिले पाहिजे, तर आपण अनेक प्रश्न सोडवू शकू. आपल्याला सर्वांना मिळून नवा भारत उदयाला आणायचा आहे. याकरिता माझ्या रूपात तुमचा हक्काचा माणूस विधान परिषदेत पाठवा ही विनंती तुम्हाला करण्यासाठी मी खोपोलीत आलो असल्याचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटले.
प्रचार दौर्‍यात शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही असणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply