Breaking News

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्गाचे देणे आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना महत्त्वाच्या सोयीसुविधा देण्यासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मंत्री मुनगंटीवार बोलत होते.
आमदार महेश बालदी यांच्या विनंती व मागणीनुसार कर्नाळा अभयारण्याच्या विकासासंदर्भात उपाययोजना करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटनाबाबत गुरुवारी (दि. 19) बैठक झाली.
या बैठकीस आमदार महेश बालदी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, सहसचिव भानूदास पिंगळे, उपवनसंरक्षक सरोज गवस आदी उपस्थित होते.
या वेळी मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या 11.65 कोटी रुपयांच्या निसर्ग पर्यटन आराखड्यास 2019मध्ये तत्वत: मान्यता देण्यात आली होती. यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी दोन्ही वास्तूविशारदाकडून आलेल्या विकास आराखड्याचा अभ्यास करून सर्वोत्तम एकच आराखडा तयार करावा. हे अभयारण्य मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलपासून 12 किमी, तर मुंबईपासून 65 किमी अंतरावर आहे. येथे मुंबईसह आसपासचे हजारो पर्यटक भेट देत असतात. या अभयारण्यातील कर्नाळा किल्ला हा पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील 12.1094 चौकिमी क्षेत्राच्या अभयारण्यामध्ये पक्षांच्या 147 प्रकारच्या जाती आहेत. हिवाळ्यात 37 स्थलांतरीत पक्षी येथे पहावयास मिळतात. विविध प्रकारच्या 642 वृक्षप्रजाती येथे आहेत. 11 प्रकारचे सस्तन प्राणी, 23 प्रकारचे सर्प, पाच प्रकारचे सरडे आणि बेडूक, 10 प्रकारचे कोळी आणि फुलपाखरांच्या 56 प्रजातीही येथे अस्तित्वात आहेत. या सर्वांचे जतन करून निसर्ग पर्यटन आराखडा अंतिम करावा.
आराखड्यामध्ये पर्यटकांना कसे आकर्षित करता येईल अशा वेगळ्या कल्पनांचा विचार करण्यात यावा. महिला-पुरूष प्रसाधन, चेंजिंग रूम, सुरक्षा कक्ष, थिएटर याचा नव्याने समावेश करण्यात यावा. ट्री हाऊस ही कल्पना चांगली असून हे सर्व लाकडाचेच असावे. लाकडी डेक, शयनगृह, कुटीर यांचाही नवीन आराखड्यात समावेश करावा, अशा सूचनाही मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या. कर्नाळा परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी अलिबाग येथील वन विभागाची मान्यता घेऊन स्थलांतर करावे. कोणत्याही परवानग्या, मान्यता वन विभागाकडून प्रलंबित राहता कामा नये. शिवाय कर्नाळा किल्ल्याची डागडुजी, दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी सादरीकरण केले. आराखड्यात अ‍ॅडव्हेंचर पार्क, मुलांची खेळाची जागा, धबधबे, पुलांची दुरूस्ती, पाथवे, बचत गटांचे कॅन्टीन, प्रवेशद्वारावर आणि परिसरात सीसीटीव्ही, विद्युतीकरण, पक्षी निरीक्षण पॉईंट आदींचा समावेश आहे.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply