नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
माणगाव : प्रतिनिधी
माणगांव तालुका पूर्व विभाग म्हणून ओळखल्या जाणार्या पळसगाव भागात काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्या असल्याचे अनेक नागरिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना माणगाव वनविभागाचे वनरक्षक अनिरुद्ध ढगे यांनी दिल्या आहेत. वनविभागाने या भागात गस्त वाढवली आहे.
ढालघर फाटा येथील विंचवली येथील गावातील नागरिकांच्या व होडगाव कोंड येथील काही दुचाकीस्वारांच्या बिबट्या निदर्शनास आला. त्याचबरोबर आंब्रेवाडी येथील गावातील दोन गुरे त्यांनी खाल्ली असल्याची चर्चा या भागात सुरू आहे. रविवारी रात्रीच्या वेळी रिक्षाचालक पराग सावंत यांनी आंब्रेवाडी ते पळसगांव बुद्रुकदरम्यान बिबट्या रस्त्याच्या कडेला उभा असलेला पाहिला. त्यांनी आंब्रेवाडी येथील पोलीस पाटील राकेश पवार यांना कळविल्यानंतर माणगांव तालुका वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे यांना दूरध्वनीद्वारे बिबट्या दिसल्याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी व अधिकार्यांनी त्या भागात गस्त वाढविली आहे.
जाहीर आवाहन
नागरिकांनी गावातील गुरे रात्रीच्या वेळी बाहेर ठेऊ नये, रानात फिरत असताना घोळक्याने राहावे, सोबत मोबाईल असल्यास गाणी सुरू ठेवावित, गावात सकाळी व सायंकाळ स्पीकरवर शक्य असल्यास गाणी लावावीत ज्याने लोकवस्ती आहे हे कळेल, रात्रीचा प्रवास टाळावा, आपली सुरक्षा हेच आपले ध्येय असून सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.