अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने अमृतग्राम डिलीटल करप्रणालीद्वारे घरपट्टी व पाणीपट्टी प्रत्येक घराला दिलेल्या क्यूआर कोडने मोबाईल अँड्राईड अॅपद्वारे वसुली करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली चेंढरे ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषद यांनी विकसीत केली असून ती अत्यंत उपयुक्त आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच असा उपक्रम राबवला जात असून यामुळे पारंपारीक घरक्रमांक इतिहास जमा होणार आहे. ग्रामपंचायत आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचा मुलभूत पाया म्हणजे करवसुली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची पारंपारीक पध्दत तितकीशी प्रभावीपणे राबविता येत नाही. तसेच आजचे डिजीटल युग अँड्राईडचा वापर सर्रास करीत आहेत. त्याचप्रमाणे कोविड-19 च्या वेळेस नागरीकांना बर्याचशा गोष्टी घरबसल्या मिळाव्यात, अशा अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्या अनुषंगाने ही करप्रणाली विकसीत करण्यात आली आहे. ही करप्रणाली सर्वंकष उपयुक्त होण्याच्यादृष्टीने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्वत: संगणकीय प्रणालीचे सुक्ष्म निरीक्षण केले. त्यामध्ये अतिरीक्त सुधारणा सुचवून त्याचे निरीक्षण करणे सहज शक्य होईल अशा प्रकारे विकसित करुन घेतली आहे. जेणे करुन पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली जास्तीत जास्त करण्यासाठी नियोजन आणि पाठपुरावा करणे सुलभ झाले आहे. प्रणालीमुळे ग्रामपंचायतीकडून दिले जाणारे जुने पारंपारीक घरक्रमांक इतिहास जमा होणार आहेत. आता क्यूआर कोड हीच घराची ओळख असणार आहे. त्यामध्ये खातेधारकाची माहिती संकलीत केली आहे आणि त्याद्वारे खातेधारकाची घरपटटी व पाणीपटटी वसुली ही मोबाईल अॅपद्वारे युपीआय, रोख, धनादेश, क्रेडिट कार्ड, डेबीटकार्ड तसेच नेट बँकींगद्वारे केली जाते व त्याची पावती संबंधित खातेधारकास मोबाईलवर पीडीएफ स्वरुपात प्राप्त होते. प्रणालीचा वापर करुन अँड्राईड मोबाईल आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरच्या माध्यमातून अधिकृत अधिकारी आणि कर्मचार्यांना वसुली करणे सोपे झाले आहे. अशी ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली ग्रामपंचायतीच्या उप्तन्न वाढीस निश्चीतच आधारभूत झाली आहे. चेंढरे ग्रामपंचायतमधील सर्व खातेदारांचा डेटा अचुकपणे अपडेट करुन ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली यंत्रणा यशस्वीपणे राबविणारी चेंढरे ग्रामपंचायत पहिली ग्रामपंचायत आहे.
घरबसल्या भरता येणार
घरपट्टी व पाणीपट्टीची मागणी व सवलतीचा संदेश संगणकीय प्रणालीद्वारे खातेधारकास प्राप्त होईल. घरपट्टी व पाणीपट्टी वसुली बाबतचे अहवाल पाहता येतात. खातेधारकास आपली घरपट्टी व पाणीपट्टी घरबसल्या लिंकद्वारे सुध्दा भरता येणे शक्य झाले आहे.