उन्हेरे कुंडावर स्नानासाठी स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावाजवळ असलेल्या कुंडामध्ये ऐन गुलाबी थंडीत गरम पाणी पृथ्वीच्या उदरातून येत असून हा निसर्गाचा चमत्कार अनुभवण्यासाठी, तसेच स्नान करण्याकरिता सध्या या ठिकाणी स्थानिक व पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली येथे श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक उन्हेरेजवळ असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नानासाठी आवर्जून येत असतात. स्नान झाल्यानंतर येथील श्री विठ्ठलाचे मंदिरात दर्शन घेतात. त्याचप्रमाणे दिवाळीनंतर शाळांच्या सहलीला आलेले विद्यार्थीसुद्धा स्नानाचा आनंद घेतात.
कुंडातील गंधमिश्रीत पाण्यात स्नान केल्यास त्वचेचे विकार, सांधेदुखी आदी आजार बरे होतात असे म्हटले जाते. म्हणून येथे महाराष्ट्रासह देश-विदेशातील लोक येत असतात. सर्व ऋतूंमध्ये हे स्थान उपयुक्त आहे, परंतु थंडीमध्ये येथे अधिक गर्दी असते. सध्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेले हे स्थळ पर्यटकांनी बहरलेले पहावयास मिळत आहे.
ताजेतवानेपणाचा अनुभव
उन्हेर येथे एकूण तीन कुंड आहेत. त्यातील दोन कुंड गरम पाण्याची, तर एक कुंड थंड पाण्याचे आहे. येथे स्नान केल्यास ताजेतवाने वाटते व शरीरातील क्षीण नाहीसा होतो. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोक, दिवसभर मोलमजुरी करून आलेले कामगार, शेतात काम करून थकलेले शेतकरी संध्याकाळी येथून स्नान केल्याशिवाय घरी जात नाहीत.