Breaking News

नवी मुंबईत सुरू होणार कोरोना चाचणी केंद्र; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश; महापालिकेकडून दखल

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची प्रचंड वाढती संख्या पाहता कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल जलद प्राप्त व्हावा, याकरिता नवी मुंबईमध्येच कोरोना टेस्टिंग केंद्र व लॅब उभारणेकरिता आमदार मंदा म्हात्रे या गेले चार महिने सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले आहे. लवकरच नवी मुंबईमध्ये कोरोना चाचणी केंद्र उभारले जाणार असून त्याचा नागरिकांना फायदा होऊन कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.            

आमदार म्हात्रे यांनी नवी मुंबईत स्वतंत्र कोरोना टेस्टिंग सेंटर उभारणीकरिता दि. 5 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सदरबाबत आमदार निधीतून तरतूद करण्यासंबंधी पत्र देण्यात आले होते. तदनंतर नवी मुंबईतील रुग्णांचा वाढता प्रभाव पाहता तसेच एपीएमसी बाजार आवार हा केंद्रबिंदू असल्याने दि. 21 मे रोजी एपीएमसी बाजार आवारात कोरोना चाचणी केंद्र उभारण्याची मागणी तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व एपीएमसीचे प्रशासक व अतिरिक्त आयुक्त  सतीश सोनी यांजकडे केली होती. तत्कालीन आयुक्त यांना दि. 28 मे रोजी पुन्हा सदरबाबत स्मरणपत्र देण्यात आले व  दि. 1 जून रोजी बंद अवस्थेतील असलेले वाशी येथील जुने कामगार हॉस्पिटल येथे कोरोना टेस्टिंग सेंटर व बाजूलाच असलेल्या कर्मचारी वसाहतमध्ये विलीगिकरण केंद्र उभारण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच नवी मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त  अभिजित बांगर यांची शिष्टमंडळासह प्रत्यक्ष भेट घेवून कोरोना टेस्टिंग केंद्र लवकरात लवकर उभारणीकरिता पाठपुरावा केला होता.

आमदार म्हात्रे यांच्या सततच्या प्रयत्नाने तसेच शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईत स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी आ. म्हात्रे यांनी सांगितले की, कोरोना महामारीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना नवी मुंबईतील रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस सुमारे 300 ते 500 ने वाढत आहे. महालिकेकडे स्वतःचे कोरोना चाचणी केंद्र नसणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. परंतु नवी मुंबईत लवकरच स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र उपलब्ध होणार असल्याने रुग्णांची संख्या आटोक्यात येणार असून कोरोना महामारीवर आपण नक्की विजय मिळवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा अहवाल हा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये चाचणी करीता पाठवावा लागत असल्याने अहवाल येण्यास उशीर होत होता. त्यामुळे कोरोना रुग्ण हा इतरांच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वाढत होती. नवी मुंबईत स्वतंत्र कोरोना टेस्टिंग केंद्र व लॅब उभारावी याकरिता मी माझा आमदार निधीही दिला आहे. – आमदार मंदा म्हात्रे

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply