पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील तारा गावाच्या हद्दीत ऑडी गाडीत झालेल्या हत्येप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आणखी दोघा जणांना सहआरोपी म्हणून गजाआड केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर तारा गावाच्या हद्दीत पुणे येथील व्यापारी व नामचीन गुंड संजय कार्ले यांची सोन्याच्या देवाण-घेवाण वरून हत्या करण्यात आली होती. तसेच त्याचा मृतदेह ऑडी गाडीमध्ये ठेवून पसार झाले होते. पुणे येथील नामचीन गुंडाचा पनवेल हद्दीत हत्या झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने सातत्याने पाठपुरावा करून या गुन्ह्यातील आरोपी मोहसीन मुलाणी (वय 37) आणि अंकित कांबळे (वय 29) यांना पकडले होते. या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना या हत्येत आणखी दोघांचा सहभाग असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पनवेल मधील करंजाडे येथून सुशील धर्मा यादव (वय 38, रा. करंजाडे) व रोहित भरत कानिटकर (वय 36, रा.कळवा) यांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपींनी खुनाची घटना घडल्यानंतर या दोघांची भेट घेऊन त्यांच्याकडे या गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्रे व रोख रक्कम चार लाख रुपये व सदर पैशाच्या वाटणीची माहिती देऊन ते दोघे फरार झाले होते. यातील दोन मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात येताच अधिक चौकशीमध्ये या गुन्ह्यात सहभाग असलेल्या इतर दोघांची नावे उघडकीस आली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहाय्यक निरीक्षक संजय गाळवे, हवालदार सुनील कुदळे, महेश धुमाळ, नाईक पंकज चांदिले, प्रकाश मेहेर आदींच्या पथकाने करंजाडे येथे सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.
अधिक तपासामध्ये त्यांनी या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या हत्येतील आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे तसेच पोलिसांचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.