पनवेल : रामप्रहर वृत्त – तारा येथील युसुफ मेहेरअली सेंटर हे आरोग्य सुविधा देत असते. त्यामुळे पंचक्रोशीतील गावातील लोकांना विश्वासात घेणे, पूर्व आवश्यक तपासण्या करणे व त्यांच्या सुचना घेण्यासाठी बुधवारी (दि. 23) तारा संकुलात एका सभेचे आयोजन केले होते. या वेळी पंचक्रोशीतील सरपंच व प्रमुख प्रतिनिधी तसेच आशा सेविका यांना आमंत्रित केले होते.
पनवेल तालुक्यातील तारा येथील युसुफ मेहेरअली सेंटर मागील 45 वर्षे ग्रामस्थांना आरोग्य सेवा देत आहे. दैनंदिन आरोग्य उपचार सेवा महागडी होत असताना सेंटरने माफक व दारिद्रय रेषे खालील लोकांना मोफत सेवा देण्याचे व्रत कायम ठेवले आहे. कोरोना महामारीमुळे व लॉकडाऊन काळात काही काळ ही सेवा खंडीत करावी लागली.
सेंटरचे डॉ. एस. पी. कांबळे व डॉ. फाटक दांपत्य यांनी कोरोना काळ सुरू असतानाही ओपीडीची सेवा अखंड सुरू ठेवली. त्यामुळे तारा पंचक्रोशीत साधारण आजारावर उपचार व आरोग्य मार्गदर्शन मिळत होते. कोरोनामुळे मायनर आपरेशन व डोळ्यांची आपरेशन थांबवावी लागली होती. ती सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे मार्गदर्शक सुचना मागवून ग्रामस्थांना मायनर आपरेशनची सेवा देण्याची तयारी दर्शविली. सभेमध्ये आलेल्या सरपंच, आशा सेविका व प्रमुखांनी सेंटर अशा प्रकारचा विचार करीत आहे याचे स्वागत केले.
विशिष्ट आजाराचे तज्ञ स्पेशालिस्ट डॉक्टरांना सुध्दा बोलवून सेवा द्यावी अशा सुचना या वेळी करण्यात आल्या. या सभेमध्ये सेंटरचे डॉ योगीनी, हरेश शहा, मधु मोहिते, डॉ. एस. पी. कांबळे, डॉ. फाटक, मालती म्हात्रे, अनिल विश्वकर्मा आदी उपस्थित होते.
सेंटरमध्येच सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध झाल्यास उपचार सेवा पनवेल व मुंबईत जावून घेण्यापेक्षा इथेच उपचार घेण्यासाठी थोडे सेवा शुल्कवाढ सुध्दा ग्रामस्थांनी देण्याची तयारी दर्शविली. जिते गावच्या सरपंच अंजनी म्हात्रे, खरोशी सरपंच चंद्रकांत घरत, केळवणे सरपंच अश्विनी घरत, तारा येथील सुनील म्हात्रे व लक्षमण ठाकुर, दुरशेतच्या सरपंच सोनाली डगर, चंद्रकांत घरत, उदय गावंड, शकुंतला पवार, सुनील जोशी व संतोष ठाकूर आदींनी चर्चेत सहभाग घेतला. असा संपर्क सेंटरने सातत्याने घडवून आणावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.