कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील बीड गावात राहणारा शेतकरी हरी फुलावरे याचे ’सायनोप्सीस’ चित्र प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. हे कला दालन कलेची पंढरी म्हणून ओळखले जाते. तेथे प्रदर्शनाचा मान कर्जतमधील शेतकरी चित्रकाराला मिळाला आहे.
जगविख्यात चित्रकार पराग बोरसे याचे मार्गदर्शन लाभल्याने कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या बीड बुद्रुक गावात राहणारा व केवळ सातवी पास झालेला शेतकरी हरी फुलावरे याच्या कुंचल्यातून चित्रे साकारू लागली. बोरसे सुरुवातीला निसर्गचित्र काढण्यासाठी वासराच्या खोंड्यात असलेल्या बीड गावाच्या परिसरात जात असे. त्या वेळी आपली गुरे चरण्यासाठी घेऊन येणारा हरी त्याची चित्रे कुतूहलाने पाहू लागला. त्यानंतर तो परागला कधी पाणी, तर कधी चहा आणून देत असे. मग त्यांची मैत्री झाली. पराग चित्रे काढत असताना हरीला चित्रकलेची आवड असल्याचे लक्षात आले.
परागने हळूहळू हरीला चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित केले. हरीनेसुद्धा चित्रे काढण्यास सुरुवात केली व त्याचा कुंचला कमालीचा फिरू झाला. परागच्या मार्गदर्शनाखाली हरीची चित्रकला आकार घेऊ लागली व ती कधी साता समुद्रापार गेली हे पराग व हरीला कळलेच नाही. हरीच्या चित्रांचे विशेष म्हणजे तो निसर्गचित्रे हुबेहूब काढत असतो. आता त्याचे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन सुरू असून ते 13 फेब्रुवारीपर्यंत खुले आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …